Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपतर्फे ‛जल्लोष स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात 

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारताच्या राष्ट्रपती पदाचा पदभार द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारताच अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपने ‛जल्लोष स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमातून आदिवासी महिलांचा सत्कार, आकाशात बलून सोडून व मेणबत्त्या लावून आनंदोत्सव साजरा केला.

फिनिक्स ग्रुपच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आणि प्रथमच राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान झाल्याबद्दल मराठा मंगल कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अपर्णा मुठे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रुपच्या अध्यक्षा ऍड ललिता पाटील, डॉ. सुनंदा गुजराथी होत्या.

राष्ट्रपतींचा सत्कार तात्काळ करता येणार नाही म्हणून प्रातिनिधिक सत्कार तालुक्यातील आदिवासी महिला सरपंच उषाबाई प्रकाश भिल (चौबारी), रेखा बाबुराव भिल ( दहिवद खु), मनीषा विनोद भिल(एकरुखी), मीराबाई युवराज भिल (रणाईचे), सुनंदा मंगल भिल(तासखेडा), रत्नबाई पंढरीनाथ भिल (सडावन), सखुबाई छबुलाल भिल (सात्रीं), हिराबाई अशोक भिल( दहिवद)मुडी मांडळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता संजय भिल आदी महिला पदाधिकारींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ऍड ललिता पाटील म्हणाल्या की महिलांना संधी पुरुषच देतात मात्र मिळालेल्या संधीचे सोने महिलाच करतात असे सांगून त्यांनी आम्हा महिलांना आरक्षणाची गरज नाही आम्ही महिला आणि पुरुष दोघांच्या जागेवर उभे राहू शकतो व काम करू शकतो. देशाचे सर्वोच्च पद आदिवासी महिलेला मिळणे ही देशाच्या दृष्टीने खूप मोठी बाब असून देशाभरात महिलांना आनंद झाला असल्यानेच हा जल्लोष करण्यात येत आहे.

यावेळी आकाशात तिरंग्याच्या रंगांचे बलून सोडण्यात आले. मेणबत्त्या लावून जल्लोष करण्यात आला. पेढे वाटण्यात आले. ऍड ललिता पाटील यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात भारती पाटील यांनी फिनिक्स ग्रुपचा आढावा घेतला तर वसुंधरा लांडगे यांनी सूत्रसंचालन व स्त्री शक्तीचा पोवाडा सादर केला.

सुचिता पाटील, प्रतिभा मराठे, डॉ. मंजुश्री जैन, अनिता सूर्यवंशी या ग्रुपचा सदस्या व शहर व तालुक्यातील सर्व महिला मंडळ उपस्थित होत्या.

कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, प्रा. श्याम पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन, विद्या हजारे, करूणा सोनार उपस्थित होते.

Exit mobile version