Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फसव्या संदेशांची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतली गंभीर दखल

जळगाव/धुळे/नंदुरबार : वीज देयकाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने तातडीने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, अशा स्वरूपाचे बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आज दिले.

 

त्यानंतर तातडीने पावले उचलत महावितरणने मुंबई आणि महाराष्ट्र सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.महावितरणच्या नावाने वीज ग्राहकांची अशा पद्धतीने दिशाभूल करणे ही गंभीर बाब आहे. महावितरणची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका यावेळी डॉ. राऊत यांनी घेतली. अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी ग्राहकांना केले आहे. केवळ महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आणि अधिकृत ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातूनच वीज बिल भरावे. याशिवाय सर्व ग्राहकांनी आपले थकित बिल भरून महावितरणला सहकार्य करावे,अशी विनंती यानिमित्ताने डॉ. राऊत यांनी ग्राहकांना केली आहे.

Exit mobile version