Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फडणवीस सरकारकडून पाच वर्षे मुंबईकरांची फसवणूक

 

मुंबई : वृत्तसंस्था । तत्कालीन फडणवीस सरकारने मागची पाच वर्षे मुंबईकरांची फसवणूक केली. मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती मागची पाच वर्षे भाजपाने राजकारण केलं आणि मुंबईकरांना फसवलं असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

एवढंच नाही तर मी माझं हे म्हणणं कागदोपत्री सिद्ध करुन दाखवेन असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला. त्यानंतर राज्य सरकारने प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचं पत्रच केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलं. त्यानंतर भाजपा विरोधात महाविकास आघाडी सरकार असा जोरदार सामना पाहण्यास मिळतो आहे.

मेट्रो कारशेडबाबत केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवण्यामागे हीन राजकारण आहे. त्या जागेवर १९६९ पासून राज्य सरकारचा अधिकार आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच आता केंद्र सरकार या जागेवर आपला दावा सांगतं आहे असाही आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

राज्य सरकारने मेट्रो ३ आणि ६ ची कारशेड कांजूरला उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा आराखडा फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आखण्यात आला होता असंही सचिन सावंत यांनी स्पष्ट केलं. अश्विनी भिडे यांनी त्यावेळी राज्य सरकारला पत्र पाठवलं होतं मेट्रो ३ च्या कारशेडसाठी कांजूरची जागा सर्वाधिक उपयुक्त असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं असंही सचिन सावंत यांनी सांगितलं.

कांजूरमार्गची जागा घेण्यासाठी ५ हजार २०० कोटी रुपये भरा असं कोर्टाने सांगितल्याचं फडणवीस म्हणतात. पण तसं काहीही नसताना हे पेसै कुणाला देण्याची भाषा फडणवीस बोलत होते असाही प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर फडणवीसांना आरेमध्येच डेपो का हवा होता? त्यामागे त्यांचा काय उद्देश होता हेदेखील आपण लवकरच सांगणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version