Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फडणवीस यांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही

पुणे : वृत्तसंस्था । “देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी राग मानून घेऊ नये”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात त्यान्च्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

“राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळलं की ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो”, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर, “शरद पवारांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते. मी कायदेशीर तरतुदीं संदर्भाने बोलत होतो. पण राष्ट्रवादीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणतात, तर मला ‘चंपा’ म्हणतात. हे कसं काय चालतं?”; अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना प्रतिप्रश्न केला होता. त्यावर आज जयंत पाटील यांनी उत्तर दिलं.

कोरोनाच्या परिस्थितीबद्दलही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. “कोणत्याही परिस्थितीला लॉकडाऊन हा सुयोग्य पर्याय नाही. सामान्य माणसांच्या आरोग्याचा विचार करण्याची सध्या गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यास मदत होईल”, असे ते म्हणाले.

“राज्य सरकारवर ६७ हजार कोटींची थकबाकी असूनही या अवस्थेत सरकार वीजेसंदर्भातील दुरुस्तीची कामे करणार आहे. आपली व्यवस्था टिकणे महत्वाचे आहे. आम्ही वीज बिलाबाबत मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आहोत. पण मागील सरकारने काम केले असते, तर ही वेळ आली नसती. आम्ही नक्कीच वीज बिलाबाबत निश्चित मार्ग काढू”, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.

“विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणतात पदवीधर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल. बरं झालं निवडणुकीच्या आधीच सत्तांतर होईल असं नाही म्हणाले. पण ते काहीही म्हणाले तरी आता राज्याला भाजप सरकारची गरज राहिलेली नाही”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Exit mobile version