Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फडणवीसांनी करोना गिळून ढेकर दिला असता का ? : शिवसेनेचे भाजपला प्रतिउत्तर

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत ते महाराष्ट्र विषाणूमुक्त करण्यासाठी. फडणवीस यांनी वेगळे काय केले असते? करोना विषाणू गिळून त्यांनी ढेकर दिला असती की त्या विषाणूच्या मागे सीबीआय, ईडी वगैरे लावून या व्हायरसची बोलती बंद केली असती? असा सवाल शिवसेनेने केला आहे. निरंजन डावखरे यांनी राज्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी देवेंद्र फडणवीस यांची गरज असल्याचे म्हटले होते. यावरून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.

 

अग्रलेखात पुढे म्हटलेय की, हवस के शिकार’ असा एक ‘ड’ दर्जाचा चित्रपट चाळिसेक वर्षांपूर्वी येऊन गेला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात जो विकार बळावू पाहत आहे तो म्हणजे राजकीय ‘हवस के शिकार’ म्हणावा त्यातलाच प्रकार आहे. संपूर्ण देश, आपला महाराष्ट्र कोरोना व्हायरसशी एक युद्ध म्हणून लढत आहे. जनतेच्या जिवाशी खेळणार्या विषाणूशी इतका मोठा लढा महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मंत्रिमंडळ मोठी झुंज देत असताना भाजपातील काही उपर्या ‘अक्कलवंतां’नी टीकेची निरांजने ओवाळली आहेत. उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव शून्य असल्याने आता महाराष्ट्राला म्हणे पुन्हा अनुभवसंपन्न देवेंद्र फडणवीसांची गरज आहे. हे सर्व कोण सांगते आहे? तर ज्यांनी सारी हयात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पखाल्या वाहिल्या व नंतर ‘हवा’पाणी बघून भाजपात उड्या मारल्या ते. असे बेडूक जर फडणवीस यांच्यासाठी ही ‘करोना मोहीम’ राबवीत असतील तर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर काय ही वेळ आली, काय हे त्यांचे अधःपतन झाले असेच विचारावे लागेल. अशा भाडोत्री भगतगणांचे ‘क्वारंटाईन’ फडणवीस यांनी केले नाही तर त्यांची उरलीसुरली पतही लयास जाईल.

Exit mobile version