Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फ्लॅट खरेदीच्या नावाखाली एकाची ४१ लाखात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुक्ताईनगरात राहणारे दिनेश रामचंद्र तिवारी (वय-४९) यांना फ्लॅट देण्याचे सांगून पाळधी ता. धरणगाव येथील दाम्पत्याने सुमारे ४१ लाख १९ हजार रूपयात फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनिवारी पावणे चारवाजता दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, दिनेश रामचंद तिवारी (वय-४९) रा. वासुकमल नंदनवन अपार्टमेंट, मुक्ताईनगर जळगाव हे कुटुंबियांसह राहतात. शेती काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. सप्टेंबर २०१९ रोजी (नक्की तारीख माहित नाही)त्यांची ब्रोकर इस्टेट एजंट बिरज इंदरचंद जैन यांच्यामार्फत हरीष रामचंद्र झवर व पुजा हरीष झवर दोन्ही रा. पाळधी बु ता. धरणगाव यांचे मालकीचा जळगावातील मुक्ताईनगरातील वासुकमल अपार्टमेंट येथे फ्लॅट विक्रीला असल्याचे सांगितले. दिनेश तिवारी यांनी तो फ्लॅट पाहिला व आवडला. सदरील फ्लॅटवर कोणताही बोजा नसल्याचे इवर यांनी सांगितले. तिवारी यांनी ११ हजार रूपयांचे टोकनही दिले. दरम्यान तिवारी यांनी मालमत्ता घेतांना कोणाचाही आक्षेप होवू नये म्हणून ३० सप्टेंबर २०१९ रोजी वर्तमानपत्रात नोटीस देण्यात आली.

७ ऑक्टोबर २०१९ रोजी फ्लॅट खरेदी संदर्भात झंवर यांना सांगितले असता सौदापावती न करता तोंडी घराचा ताबा देवून खरेदी नंतर करतो असे सांगितले. तिवारी यांनी विश्वास ठेवून झंवर यांच्या मागणीप्रमाणे ७ ऑक्टोबर रोजी ७ लाख ४० हजार, ९ ऑक्टोबर रोजी ५ लाख, १० ऑक्टोबर रोजी ५ लाख, ११ ऑक्टोबर रोजी ५ लाख, १४ ऑक्टोबर रोजी ४ लाख, ३० नोव्हेंबर २०१९ रोजी चेकने ५ लाख व ४ लाख ४० हजार रूपये रोख, गुगलपे ने अनुक्रमे १८ हजार व २० हजार असे एकुण ४१ लाख १९ हजार रूपये दिले. दरम्यान तिवारी यांचा मे २०२० मध्ये अपघात झाला होता त्यामुळे ते घरीच होते. तिवारी यांनी झंवर यांच्याकडे फ्लॅट खरेदी करण्याचा तगादा लावला त्यानी कागदपत्रे दिली. तर त्यात स्टेट बँकेचा बोजा असल्याचे दिसून आले. फ्लॅट खरेदीसाठी बोजा क्लियर करून द्यावा असे सांगितले असता हरीष झवर यांनी ८ सप्टेंबर २०२० तिवारी यांना नोटीस पाठविली. त्यात ६७ लाख ५१ हजार रूपये एवढी ठरलेली असून आपण फक्त ५ लाख ३८ हजार रूपये दिल्याचे नमूद केलेले होते. यावरून आपली फसवणूक झाल्याचे तिवारी यांया लक्षात येताच त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिनेश तिवारी यांच्या फिर्यादीवरून काल शनिवार २४ जुलै रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास हरीष झंवर आणि पुजा हरीष झवर यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख करीत आहे. 

Exit mobile version