Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र ; शिक्षकाचा गळा चिरला

पॅरीस : वृत्तसंस्था । प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या शिक्षकाचा एकाने गळा चिरला. शिक्षकाची हत्या करण्यापूर्वी त्याने धार्मिक घोषणाही दिल्या घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांसोबत चकमक झाली. या चकमकीत आरोपीचा खात्मा करण्यात आला.

मारेकऱ्यांचा दहशतवादी घटनेशी संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येणार आहे. वर्गात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतचा धडा शिकवताना या ४७ वर्षीय शिक्षकाने ‘चार्ली हेब्दो’ या साप्ताहिकामध्ये प्रकाशित झालेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवले. त्याआधारे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काही मुद्ये मांडले. प्रेषितांचे व्यंगचित्र दाखवल्याच्या रागातून १८ वर्षीय आऱोपीने शिक्षकाची निर्घुण हत्या केली.

घटनेची माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. घटनास्थळापासून काही अंतर दूर गेल्यावर त्यांने पोलिसांना बंदुकीचा धाक दाखवत शरणागती पत्करण्यास नकार दिला. पोलिसांवर आरोपीने गोळ्या झाडल्या. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात हा आरोपी ठार झाला.

आता फ्रान्समध्ये राजकीय वातावरण तापले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन हे शिक्षकाच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ही घटना म्हणजे इतिहासाची हत्या आहे. दहशतवाद्यांनी देशाच्या प्रजासत्ताक मूल्यांवर हल्ला केला आहे. फ्रान्सची जनता या दहशतवाद्यांचा फुटीरतेचा डाव यशस्वी होऊ देणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

पोलिसांनी या घटनेनंतर एका अल्पवयीन मुलासह चारजणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे हल्लेखोर आरोपीशी संबंधित आहेत. पोलिसांनी या चौघांची चौकशी सुरू केली आहे. शिक्षकाची हत्या केल्यानंतर आरोपीला पळून जाण्यास त्यांनी मदत केली असल्याचा आरोप आहे.

शिक्षकाची हत्या करणारा आरोपी रशियातील चेचेन्या भागात राहणारा होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर रशियन गुप्तचर संस््था आणि पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. रशियाच्या चेचेन्या भागात दहशतवादी आणि रशियन सैन्यामध्ये चकमकी झडत असतात. या भागात शांतता रहावी यासाठी मोठ्या संख्येने रशियन जवान तैनात करण्यात आले आहेत.

इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैंगबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्यानंतर सात जानेवारी २०१५ रोजी चार्ली हेब्दोच्या पॅरिस येथील कार्यालयावर दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये १२ जण ठार झाले होते. या हल्ल्यात फ्रान्समधील काही दिग्गज व्यंगचित्रकारही ठार झाले. चार्ली हेब्दोच्या मुखपृष्ठावर अनेक व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचाही समावेश आहे. हे व्यंगचित्र जीन काबूट यांनी काढले होते. २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

साप्ताहिकाच्या कार्यालयावर सात जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात संपादकांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडाभरात हे साप्ताहिक पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर त्याचा खप १० हजार प्रतींवरून थेट दोन लाख प्रतींवर पोहोचला होता.

Exit mobile version