Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्राणघातक हल्ला करणाऱ्या सात आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून बापलेक आणि पुतण्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सात आरोपींना जळगाव जिल्हा न्यायालयाने ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी ६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

याबाबत माहिती अशी की,  पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवाशी शेख अमीर शेख भाईनिया हे त्यांच्या मुलगा अन्सार शेख आमीर आणि पुतण्या अफरोज शेख रहीम हे  २७ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांच्या शेतात झाडाच्या फांद्या तोडत असताना त्या ठिकाणी अब्दुल गनी शेख कमरोद्दीन, अब्दुल रउफ शेख कमरुद्दीन, वसीम शेख गुलाम मोहम्मद, अहमद शेख गुलाम मोहम्मद, जुनेद शेख गुलाम मोहम्मद, मेहबूब शेख सईद आणि गुलाम मोहम्मद अब्दुल हबी सर्व रा. नगरदेवळा ता. पाचोरा यांनी शेख अमीर शेख भाईनिया व त्यांचा मुलगा अन्सार आणि पुतण्या अफरोज यांना लाथा, काठ्या व कोयत्यांनी वार करून  गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात पाचोरा पोलीस ठाण्यात शेख अमीर शेख भाईनिया यांच्या फिर्यादीवरून ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. तपास अधिकारी सचिन राऊत हे गुन्ह्यातील तपासाचे काम करत होते. हा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.एम. खडसे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात जखमी साक्षीदार व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यासोबत तपास अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. गुरुवार १० मार्च रोजी न्यायालयात कामकाज झाले असता दाखल गुन्ह्यातील आरोपींना दोषी ठरविण्यात आले. सातही आरोपींना ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी ६ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता निलेश चौधरी आणि ॲड. शरीफ यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी देविदास कोळी यांनी मदत केली.

Exit mobile version