Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्राचार्या अलका पाटील कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहात

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील नि. द. तावरे कन्या माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या अलका रमेश पाटील- शेळके यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच महालपुरे मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरा झाला. 

दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी आपल्या प्राचार्य पदाच्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर व  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल शिक्षण संस्था, नातलग व मित्र परिवारातर्फे त्यांचा हा कर्तव्यपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रा. प्रतापराव तावरे यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, गिरणाई शिक्षण संस्थेचे चेअरमन पंडित शिंदे, भडगाव येथील महाविद्यालयाचे चेअरमन  देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा नोटरी अॅड. योगेश पाटील, पाचोरा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त रजिस्ट्रार पितांबर पाटील, प्रा. आर. एस. सोनवणे (ऑडिटर),  शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, एम. एम. महाविद्यालयाचे रजिस्ट्रार रमेश शेळके, माध्यमिक पतपेढीचे माजी संचालक प्रमोद गरुड, पत्रकार शिवाजी शिंदे, प्रा. रवींद्र चव्हाण यांचेसह पाचोरा – भडगाव तालुक्यातील विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, प्राध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्राचार्या अलका शेळके (पाटील) यांच्या कार्याचा गौरव केला. शालेय शिस्त, उत्तम प्रशासन व कठोर निर्णयांची अंमलबजावणी याद्वारे अलका शेळके (पाटील) यांचे कणखर नेतृत्व पाचोरा परिसराने अनुभवले. याबद्दल उपस्थितांनी आपल्या मनोगतात मुक्तकंठाने त्यांचा गुणगौरव केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते  अलका शेळके (पाटील) व रमेश शेळके (पाटील) यांना गुलाब पुष्प, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. आयोजकांतर्फे अलका शेळके यांचे जावई शिवदत्त साळुंके व डॉ. मंदार गद्रे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. उपस्थित नातलगांनी देखील शेळके दाम्पत्याचा साडी -चोळी भेटवस्तू देऊन यथोचित गौरव केला.

अलका शेळके यांनी अत्यंत भावनात्मक शब्दात सत्काराला उत्तर दिले. आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत ज्या सर्वांनी मला सहकार्य केले ते सर्व शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनी तसेच अधिकारी व पदाधिकारी यांचे त्यांनी ऋण व्यक्त केले.  डॉ. माधवी शेळके- गद्रे हिने प्रास्ताविक केले. यशवंत सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी शेळके- साळुंखे हिने आभार मानले. या कार्यक्रमाला पाचोरा भडगाव पंचक्रोशीतील सर्व आजी – माजी शिक्षक, प्राध्यापक व विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, तसेच आप्तेष्ट व नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version