प्रशांत किशोर यांची कॉंग्रेसला ‘ऑफर’

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या प्रचाराची रणनिती आखण्यासाठी प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस पक्षाला ऑफर केल्याची माहिती समोर आली आहे.

 

या वर्षाच्या अखेरीस काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असून यात गुजरातचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या प्रचाराची रणनिती आखण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी रस दाखविल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर, गत सप्टेंबरमध्ये कॉंग्रेस नेतृत्व आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याचं दिसून आले होते. त्यानंतर कॉंग्रेसने किशोर यांच्या एका माजी सहाय्यकासोबत निवडणूक प्रचारासाठी करार केला, तर प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेससाठी काम करून त्यांना विजय मिळवून दिला होता. यानंतर आता गुजरातमध्ये प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा कॉंग्रेससाठी काम करण्यास इच्छुक आहेत.

प्रशांत किशोर यांनी गुजरात निवडणुकीसाठी फक्त एक वेळा काम करण्याची ऑफर कॉंग्रेसला दिली आहे. कॉंग्रेसने त्यांच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राहुल गांधी यांच्या मंगळवारी गुजरात कॉंग्रेस नेत्यांच्या भेटीदरम्यान हा प्रस्ताव आल्याची माहिती एका वाहिनीने दिली आहे.

गुजरात कॉंग्रेसचे काही नेते किशोर यांना प्रचारात सहभागी करून घेण्यास उत्सुक असल्याचं सांगण्यात येंतंय. मात्र, अंतिम निर्णय राहुल गांधीं हेच घेणार आहेत.

Protected Content