Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रवीण दरेकरांचे ‘रंगवलेले गाल’ वादाच्या भोवर्‍यात !

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीका करतांना पातळी सोडून बोलल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर वादात सापडले असून त्यांनी आपल्या वक्तव्यावरून माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर आरोप करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ चांगलीच घसरली. ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा हा पक्ष आहे’, असे त्यांनी म्हटले आले आहे. लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असून या प्रवेशाबाबत बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे वक्तव्य करत असतांना हे वाक्य त्यांच्या तोंडून निघाले. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शिरूर येथे राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला दरेकर उपस्थित होते. येथेच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर केलेल्या टिकेमुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात येतेय.

तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिला आहे. ”प्रवीण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा आम्ही महिलांचा अपमान करणार्‍यांचे थोबड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. यासंबंधी त्यांनी ट्विट करत प्रवीण दरेकर यांना इशारा दिलेला आहे.

Exit mobile version