Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा उद्या जिल्हास्तरीय मेळावा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

mudra loan

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावेत. याकरीता संपूर्ण जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता के. सी. ई. सोसायटीचे मैदान, ए. टी. झांबरे विद्यालयाजवळ होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे, जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर भारतीताई सोनवणे, आमदार स्मिताताई वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधि‍कारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

या मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांबाबत प्रबोधन करण्यात येणार असून प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतंर्गत स्वयंरोजगारासाठी तसेच लघु उद्योगासाठी त्याचबरोबर आपला व्यवसाय वृध्दीगंत करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणेबाबत विविध बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे स्टॉल लावण्यात येणार असून याठिकाणी बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

याचप्रकारचे मेळावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार असून त्याच्या तारखा व ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. एरंडोल-17 फेब्रुवारी, डी. डी. एस. पी. महाविद्यालय, म्हसावद नाका. धरणगाव- 18 फेब्रुवारी, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. पारोळा- 24 फेब्रुवारी, कृषी उत्पन्न बाजार समिती. अमळनेर- 25 फेब्रुवारी, साने गुरुजी विद्यालय, धुळेरोड. चोपडा- 27 फेब्रुवारी, पंकज महाविद्यालय, बोरोले नगर, यावल रोड, यावल- 28 फेब्रुवारी, धनाजी नाना महाविद्यालय. फैजपूर. रावेर- 29 फेब्रुवारी, विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय. मुक्ताईनगर- 2 मार्च, संत मुक्ताई कला व वाणिज्य महाविद्यालय. भुसावळ- 4 मार्च, बियाणी पब्लीक स्कुल, भिरुड हॉस्पिटलजवळ. बोदवड-6 मार्च, बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय. जामनेर- 11 मार्च, एकलव्य माध्यमिक विद्यालय. पाचोरा- 12 मार्च, मानसिंगा मैदान, शिवाजी चौक, भडगाव- 13 मार्च, शेतकरी सहकारी संघ, पाचोरा रोङ. चाळीसगाव- 16 मार्च, 2020 रोजी राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय याठिकाणी होणार असून सर्व मेळाव्यांची वेळ ही सकाळी 11 वाजता राहणार आहे.  या मेळाव्यांना जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधि‍कारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Exit mobile version