Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा रस्ता अपघातात मृताच्या कुटुंबियांना लाभ

यावल –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या लोकपयोगी योजना या सर्वसामान्य नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत किती जिव्हाळ्याच्या व दिलासा देणाऱ्या ठरतात याचा प्रत्यय प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा नुकताच लाभ मिळालेल्या साकळी येथील रहीवासी असलेल्या अश्विन नेवेसह कुटूंबाला आलेला आहे.

 

याबाबत सविस्तर असे की, यावल तालुक्यातील साकळी येथील एक सर्वसामान्य शेतकरी अशोक पद्माकर नेवे (वय- ५३) यांचे बऱ्हाणपूर- अंकलेश्वर या रस्त्यावर मोटरसायकल अपघातात जुलै महिन्यात अपघाती दुःखद निधन झाले.  स्व.अशोक नेवे हे कुटुंब प्रमुख  होते. अचानक व अपघाती जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दरम्यानच्या काळात आपले वडील यावल येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेचे खातेदार असल्याने त्यांचे हाताचे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी स्व.अशोक नेवे यांचा मुलगा अश्विन नेवे हा बँकेत गेला असता त्याच्या वडिलांच्या बचत खात्यातून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेअंतर्गत बारा रुपयांचा प्रीमियम कापला गेलेला असल्याचे दिसून आले .त्यावर बँकेचे सीईओ चंद्रकांत वाणी यांनी आपल्या बँकेच्या माध्यमातून सदर विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी अश्विन नेवेला  मार्गदर्शन करून संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करायला सांगून प्रकरण संबंधितांकडे पाठवण्यासाठी मार्गदर्शन केले.अश्विन नेवे याने कागदपत्रांची वेळेच्या- वेळी पूर्तता करून दिल्याने हे प्रकरण संबंधित कार्यालयाकडून मंजूर होऊन जवळपास अडीच ते तीन महिन्यातच मार्गी लागले व  विम्याच्या भरपाईपोटी अश्विन नेवेच्या बँक खात्यावर दोन लाख रुपयांची रक्कम जमा झाली. विम्याचा लाभ मिळाल्याने स्व.अशोक नेवेंच्या कुटुंबाला दुःखाच्या काळात काहीसा दिलासा मिळाला आहे. सदर विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी अश्विन नेवेला बँकेच्या वतीने सर्व पदाधिकारी व बँकेच्या कर्मचाऱ्यांनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  दरम्यान बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष डॉ.सतीश यावलकर यांच्या हस्ते चेक अश्विन नेवेला सुर्पूत करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष हेमंत चौधरी,माजी अध्यक्ष शरदशेठ यावलकर, संचालक अभिमन्यू बडगुजर,महेश वाणी, यशवंत सोनवणे,जगदीश कवडीवाले, सुरेश शेठ वाणी,दिलीप नेवे यांचे सह बँकेचे सीईओ चंद्रकांत वाणी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version