प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणगावातील आदिवासी भागाची पाहणी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी नुकतीच धरणगावातील आदिवासी भागात पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

विनिता सोनवणे यांचे आदिवासी बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. धरणगाव शहर व परिसरात पारधी, भिल्ल व पावरा आदिवासी समाज बहुसंख्येने असून त्यांच्याकडे ७/१२ व ८ अ उतारा नसून ते अतिक्रमित भागात वस्ती करून राहतात. त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, त्याचप्रमाणे शबरी घरकुल योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, आदिवासी समाजासाठी २००३/०४ पासून घरकूल योजना सुरू झाली आहे. तरी आदिवासी बांधव वंचित, उपेक्षित व दुर्लक्षित आहेत. भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबातील सबलीकरण योजना, राजीव गांधी अपघात विमा, बेघर असलेले आदिवासी बांधवांसाठी पक्के घरकुल, रेशन कार्ड व जातीचे दाखले, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्यवसायिक व तांत्रिक शिक्षण कोर्स, आदिवासी क्षेत्राचा विकासासोबत शिक्षण, पाणी, वीज, रस्ते आणि आर्थिक व सामाजिक विकास अश्या अनेक विषयावर आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याशी पुरोगामी संघर्ष परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच आदिवासी समाजाच्या समस्याबाबत आपण पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

आदिवासी वस्ती भेट प्रसंगी विनिता सोनवणे यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या व आदिवासी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन प्रशासन दरबारी पोहोचविण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष विक्रम चव्हाण, राहुल चव्हाण, गंगाराम साळुंखे, धनलाल चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, दिनेश पवार, विकास साळुंखे, आकाश पवार, अजय पारधी, मुकेश चव्हाण, जनक चव्हाण, अशोक भील, सुखदेव भील, किशोर भील, दशरथ पारधी, किरण पारधी यांसह असंख्य आदिवासी महिला भगिनी उपस्थीत होते.

Protected Content