Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोळ्यानिमित्त नेहरू चौक मित्र मंडळातर्फे शहरात ११ शेतकऱ्यांना साज वाटप

जळगाव, प्रतिनिधी । देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर अनेक वर्षापासून अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता तर करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणखी संकटात आहे. येत्या पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कृषी बांधिलकी म्हणून नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे ११ शेतकऱ्यांना पोळ्याचा साज वाटप करण्यात आला.

हा अनोखा उपक्रम गेली अनेक वर्षे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्या तर्फे करण्यात येत आहे. यंदा करोनामुळे हा कार्यक्रम न करता शेतकर्यांना बोलावून त्यांना लाभ देण्यात आला. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा असून बैलाच्या सजावटीच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांवरील रोग तसेच करोना संक्रमण यामुळे त्रस्त झालेले शेतकरी मात्र पोळा सणाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना पोळ्यासाठी खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून पोळ्याचे साज देण्यात आले.

यावेळी आयुष गांधी व ऋषभ गांधी यांच्या पुढाकारातून यंदा हा उपक्रम झाला. पंकज पाटील, नाना धनगर, प्रवीण कुंभार, श्रावण कुमार या सुमिरा परिवारातील कामगारांच्या हस्ते व उपस्थितीत शेतकर्यांना मदत करण्यात आली. प्रसंगी नेहरू चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय गांधी, उद्योजक संजय गांधी, रिकेश गांधी यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

धामणगाव, वर्डी, शिरसोली, उमाळा आदी गावांमधील शेतकर्यांना लाभ देण्यात आला. या शेतकऱ्यांना दोर, नाथ, म्होरक्या, गोंडे, सुताची लटी, गेठा असा पोळ्याचा साज टी शर्ट व पर्यावरणपूरक थैलीसह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी शेतक-यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Exit mobile version