Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलिसांनी हरयाणा सीमेवर राहुल गांधींना रोखले

चंदीगड: वृत्तसंस्था । कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये तीन दिवस बिगूल वाजवल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ट्रॅक्टर रॅली हरयाणा पोलिसांनी सीमेवरच रोखली. यामुळे राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी त्याच ठिकाणी धरणे धरले.

हरयाणा सीमेवर राहुल गांधी यांच्यासह हजारो कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे कार्यकर्ते हरयाणात प्रवेश देण्याची मागणी करत घोषणाबाजी करत आहेत. मात्र, अनेक कार्यकर्त्यांनी मास्क लावलेले नाही. शारीरिक अंतराचे देखील भान राखले गेले नसल्याचे दिसले. बॅरिकेड हटवण्यावरून देखील पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला दिसला.

राहुल गांधी यांनी ट्विट करत हरयाणा सीमेवरील परिस्थितीची माहिती देत आपला संकल्प जाहीर केला. हरयाणाच्या सीमेवर पोलिसांनी आम्हाला रोखून धरले आहे. जो पर्यंत आम्हाला जाऊ दिले जाणार नाही, तो पर्यंत मी येथेच बसून राहणार. मग दोन तास असोत किंवा ६ तास, २४ तास असोत किंवा १००, १०००-५००० तास होवोत. मी तेथून हलणार नाही. मी येथे बसून राहीन, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा हाथरस प्रकरणातही दिसला होता. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह एकूण ५ काँग्रेस नेत्यांनी हाथरसला भेट दिली होती.

Exit mobile version