Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने प्रौढाची आत्महत्या; पाच जणांविरुध्द गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । आठवडाभरापुर्वी पोलिसांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे शेजारच्याने माझे काहीच झाले नाही, असे सांगत पुन्हा मारहाण केल्याने नैराश्यात आलेल्या धरणगाव तालुक्यातील धार येथील ४२ वर्षीय प्रौढाने विष घेवून आत्महत्या केली.

याबाबत माहिती अशी की, संभाजी सुखदेव साळुंखे (४२) रा. धार ता.धरणगाव यांना २५ जुलै रोजी शेजारी राहणारे सरला कैलास साळवे व त्यांच्या मुली शितल, पूजा व पूनम यांनी घराच्या पत्र्यावर माती पडल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली. याबाबत पाळधी पोलिसात तक्रार दिली असता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन वैद्यकिय मेमो देऊन उपचारासाठी पाठविले. त्यानंतर देखील या कुटुंबाने सतत शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. याचीही माहिती पोलिसांना देण्यात आली, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.

संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट पाळधी दूरक्षेत्रात नेला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करुन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी लगेच पाच जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली. त्यानंतर सायंकाळी मृत संभाजी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास मंगा साळवे, सरलाबाई कैलास साळवे, शितल कैलास साळवे, पूजा कैलास साळवे व पूनम कैलास साळवे (सर्व रा.धार, ता.धरणगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून कैलास साळवे याला अटक करण्यात आली आहे.

मनस्ताप झाल्याने घेतले विषय
१ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पती संभाजी, मुलगा ज्ञानेश्वर व जयेश असे घरी असताना कैलास मंगा साळवे याने घरी येऊन शिवीगाळ केली व टोचून बोलला की, तु तक्रार केली, माझे काय झाले. तुझ्याकडून माझे काहीच होणार नाही. मी पोलिसांना पैसे दिले आहेत, असे म्हणत परत पती व मुलांना मारहाण केली. एकीकडे पोलिसांनी तक्रारीनंतरही कारवाई केली नाही दुसरीकडे शेजारच्याच त्रास कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. त्यामुळे मनस्ताप करुन संभाजी याने रात्री नऊ वाजता घराच्या वरच्या मजल्यावर जावून विष प्राशन करुन आत्महत्या केली. रात्री १० वाजता हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

Exit mobile version