Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलिसांच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू : शोक संतप्त नातेवाईकांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार ( व्हिडीओ )

जळगाव जितेंद्र कोतवाल । पोलिसांनी सुनील भागवत तारू (वय४० रा. चांगदेव ) या निर्दोष व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला रूग्णालयात सोडून पोलीस पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या इसमाचा रात्री मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यातील दोषी लोकांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे.

याबाबत वृत्त असे की, सुनील भागवत तारु (४०) रा.चांगदेव (मुक्ताईनगर) या तरुणाचा काल रात्री ०८.१० वाजता अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. सुनील याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला तीन दिवसांपूर्वी भुसावळ सबजेलमधून पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात व्हेटींलेटरवर ठेवण्यात आले होत. त्याला रूग्णालयात दाखल करून पोलीसांनी काढता पाय घेतला होता. त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र रात्री त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

सुनील तारु याच्या विरुध्द काही वर्षापूर्वी काकाने हाणामारीचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सुनील हा तारखेवर हजर झाला नाही.न्यायालयाने त्याच्याविरुध्द अटक वॉरंट बजावले. या वॉरंटनुसार पोलिसांनी त्याला शेतातून अटक केली. भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. या काळात पोलिसांनी कडू तारु यांच्या सांगण्यावरुन सुनीलला मारहाण केली, म्हणूनच त्याची प्रकृती खालावली आहे. यापूर्वीदेखील कडू यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी त्याला मारहाण केली होती, असे नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, पत्नी, आई, बहिण व मेहुणे यांच्यासह इतर नातेवाईकांनी आजदेखील रुग्णालयात आक्रोश केला. मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी नातेवाईकांचे म्हणणे जाणून घेत सुनील तारु याच्या प्रकृतीची माहिती घेतली. तरूणाला न्याय मिळावा,अशी आग्रही मागणी केली. सुनील यांच्या मृत्यूची वार्ता कानावर पडल्यानंतर कुटुंबियासह नातेवाईकाना अश्रू अनावर झाले. नातेवाईकांनी केसपेपरवर स्वाक्षरी केली नाही. त्यांनी जिल्हा रूग्णालयाच्या बाहेर रास्ता रोको केला. या प्रकरणात दोषींना अटक होत नाही तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या प्रकरणी खबर जिल्हापेठ पोलिसात देण्यात आली आहे.

लाईव्ह व्हिडीओजमध्ये पहा हा सर्व प्रकार :

Exit mobile version