Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोटनिवडणुकांसाठी ओबीसी उमेदवारचं देऊ — फडणवीस

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांसाठी आम्ही भाजपकडून ओबीसी  उमेदवारच देऊ ते हरले तरी पर्वा नाही असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

 

राज्यासमोर कोरोनाचं संकट उभं असताना राज्य सरकारनं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असं असताना राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या २०० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांची घोषणा मात्र राज्य सरकारने केली आहे. पुढील महिन्यात यासाठी मतदान होणार असून त्यावर आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं कठोर शब्दांत टीका करायला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी या निवडणुकांवरून थेट राज्य सरकारला उघड आव्हानच दिलं आहे!

 

राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकासआघाडीला सुनावलं आहे. “या निवडणुकांच्या विरोधात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत. पण तरीही या सरकारचा जर निवडणुका लढवण्याचा डावच असेल, तर भाजपा या सगळ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. आम्ही त्या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजून ओबीसी उमेदवार लढवू. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजपा शांत बसणार नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

 

Exit mobile version