Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पॉल मिलग्रोम, रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल

कहोम: वृत्तसंस्था । अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना लिलावाच्या सिद्धांतातील योगदानाबद्दल अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन हे अध्यापन आणि संशोधनाचे कार्य करत आहेत. लिलावाच्या प्रारुपात सुधारणेसाठी या दोघांनीही मोलाचे कार्य केले आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सीसारख्या पारंपारिक मार्गाने एखाद्या वस्तूची, सेवेची विक्री करणे कठीण असते. अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाबाबतच्या प्रारुपाची रचना केली असल्याचे रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे.

 

रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या मते, अर्थशास्त्रज्ञांनी केवळ शक्य तितकी उच्च किंमत मिळविण्याऐवजी समाजहिताने प्रेरित असलेल्या विक्रेत्यांच्यावतीने अनेक परस्परसंबंधित वस्तूंचा लिलाव करण्यासाठी नवीन स्वरुपाचा शोध लावला आहे.

अर्थशास्त्राचे पारितोषिक अधिकृतपणे अर्थशास्त्रातील स्वेरिगेस रिक्सबँक पुरस्कार म्हणून ओळखले जातात. हे स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने सुरू केले होते. उद्योजक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ १९६९ पासून हा पुरस्कार देण्यात येतो.

मागील वर्षी हा पुरस्कार ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या दोन आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांना देण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना जागतिक गरिबी निर्मूलनाच्या दिशेने करण्यात आलेल्या संशोधनासाठी देण्यात आला होता.

Exit mobile version