Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पेगॅससचा राजकीय शस्त्र म्हणून वापर, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – राहुल गांधी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आज  राहुल गांधी यांनी पेगॅससचा राजकीय शस्त्र म्हणून वापर झाल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सध्या देशातील राजकीय वर्तुळात ‘प्रोजेक्ट पेगॅसस’च्या मुद्य्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, केंद्र सरकारवर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून यावरून निशाणा देखील साधला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरणात उडी घेतल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजत आहे.    

इस्रायलने दहशतवाद्यांविरूद्ध वापरण्यासाठी वर्गीकृत केलेले पेगॅसस हे एक शस्त्र आहे. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्याविरूद्ध याचा वापर एक राजकीय शस्त्र म्हणून केला, त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी झाली पाहीजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

केंद्र सरकारवर मोठा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, “माझा फोन टॅप केला जात आहे. मला हे माहित आहे. बरेच गुप्तचर अधिकारी म्हणाले की सर आपला फोन टॅप केला जात आहे. माझ्या मित्रांना फोनद्वारे म्हटल्या जाते की तुम्ही राहुल गांधीनां सांगा की ते असे बोलले होते. मात्र मी भीत नाही याचा मला काहीही फरक पडत नाही.”

काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि दोन मंत्र्यांची हेरगिरी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल या दोन केंद्रीय मंत्र्यांची नाव समोर आली आहेत. लीक झालेल्या डेटामध्ये ३०० भारतीय मोबाईल नंबर आहेत. त्यापैकी ४० मोबाईल नंबर हे भारतीय पत्रकारांचे आहेत. विरोधी पक्षातील ३ मोठे नेते, मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री, संरक्षण संस्थेतील प्रमुख अधिकारी आणि उद्योगपतींचा यात समावेश आहे. या मोबाईल नंबरवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाळत ठेवण्यात आली होती, असा खुलासाही यात करण्यात आला आहे.

पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचाही फोन टॅप करण्यात आला आहे. प्रशांत किशोर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तेव्हा भाजपाचं सरकार आलं होतं. त्यानंतर भाजपा विरोधी पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधला. सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडुत एमके स्टॅलिन यांच्या विजयात त्यांचं मोलाचं योगदान होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाचा अभिषेक बॅनर्जी हाही निशाण्यावर असल्याचं सांगण्यात आलं आहे. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा नंबर यात आहे. हा नंबर ते २०१९ पूर्वी वापरत होते.

 

Exit mobile version