पुलवामाप्रमाणे पुन्हा हल्ला घडवण्याचा आयएसआयचा कट उघड

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा जम्मू-काश्मीरात ‘पुलवामा’ सदृश हल्ला घडवण्याचा कट असल्याची माहिती समोर आली आहे. आयएसआयने काही निवडक दहशतवाद्यांना एकत्र करुन एक दहशतवादी गट तयार केला आहे. या गटाचं नेतृत्व जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडे देण्यात आलं आहे. या गटाला ‘गजनवी फोर्स’ असं नाव देण्यात आलं आहे.

 

सुत्रांच्या माहितीनुसार, जैश, लष्कर आणि अंसार गजवत-उल-हिंद या संघटनांनी मिळून सुरू केलेला हा नवा दहशतवादी गट काश्मीरमधील भारतीय सुरक्षारक्षकांवर ‘आयईडी’ स्फोटकांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. या माहितीनंतर भारतीय लष्कराकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच महिन्यात १४ तारखेला पुलवामा येथील ‘सीआरपीएफ’च्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर भारताने पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सिर अहमद खान याच्यासह त्याच्या ४ साथीदार दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. देशात दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप या चौघांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला आहे.

Protected Content