Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यात आज एल्गार परिषद

 

मुंबई : वृत्तसंस्था । मोठ्या संघर्षानंतर पुण्यात आज एल्गार परिषद पार पडत आहे. पुण्यातील स्वारगेटच्या गणेश क्रीडा मंदिरात या परिषदेचं आयोजन केलं गेलंय.

या पार्श्वभूमीवर गणेश कला क्रीडा मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिषदेच्या ठिकाणाला पोलिस छावणीचे स्वरुप आलं आहे. परिषदेला येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून तपासणी केली जातीये.

निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी अर्ज स्वारगेट पोलिसांकडे दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील एल्गार परिषदेला परवानगी मिळावी म्हणून झटत होते. अखेर पुणे पोलिसांनी ३० जानेवारीला परिषद घेण्यासाठी परवानगी दिली होती. .

कोणत्याही परिस्थितीत एल्गार परिषद होणारच, असा निर्धार बी.जे. कोळसे पाटील यांनी केला होता. राज्य सरकारने सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असे कोळसे-पाटील यांनी सांगितलं होतं. मात्र पुणे पोलिसांनी त्याअगोदरच ३० जानेवारीला एल्गार परिषदेसाठी परवानगी दिलेली आहे.

यापूर्वी पुणे पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या नियोजित एल्गार परिषदेला परवानगी नाकारली होती. कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे कारण देत स्वारगेट पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले होते.

डिसेंबर २०१७ ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर हा तपास एनआयएने ताब्यात घेत देशभरात डाव्या विचारांच्या अनेक बुद्धिजीवींना अटक केली. यावरुन देशभरात डाव्या विचारांच्या लोकांनी मोठं काहूर माजवलं. या सगळ्या परिस्थितीत इतका वादंग सुरु असताना पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच, असा निर्धार बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला होता.

शहरी नक्षलवादाशी जोडली गेलेली एल्गार परिषद, त्यानंतर देशातील महत्त्वाच्या बुद्धिजीवींना झालेली अटक यावरुन मोठा वाद झाला. डाव्या आणि उजव्या विचारांचा हा संघर्ष इतक्या शिगेला पोहोचलाय की आत्तापर्यंत या प्रकरणात देशातील विविध न्यायालयात ११८ याचिका दाखल आहेत.

Exit mobile version