Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुणे शिक्षक मतदारसंघातही आघाडीच्या उमेदवाराचा विजय

पुणे: वृत्तसंस्था । पुणे विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर हे सहा हजार ८२३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान आमदार अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांचा पराभव केला.

भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार हे तिसऱ्या स्थानावर राहिले. या निकालासोबतच पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून अनेक अर्थांनी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. भाजपसाठी हा खूप मोठा धक्का ठरला आहे.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात तिसाव्या फेरीअखेर जयंत आसगावकर यांना १९ हजार ४२६ मते पडली तर दत्तात्रय सावंत यांना १२ हजार ६०३ मतांवर समाधान मानावे लागले. जितेंद्र पवार यांना सहा हजार ६०७ मते व लोकभारती पक्षाचे गोरखनाथ थोरात यांना पाच हजार १८० मते मिळाली आहेत.

या निकालाने पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघात नवीन समीकरणे उदयाला आली आहेत. महाविकास आघाडी या मतदारसंघांत एकदिलाने आणि एकजुटीने लढल्याचे पाहायला मिळाले. सोलापुरात बॅनरवर सुशिलकुमार शिंदे यांचा फोटो न लावल्याने झालेले नाराजीनाट्य वगळता संपूर्ण मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नेटाने प्रचार केला होता. राष्ट्रवादीला आघाडीतील अन्य दोन्ही पक्षांची साथ मिळाल्यानेच पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

भाजपसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे विभागात निवडणुकीदरम्यान ठाण मांडले होते. कोल्हापूरकर चंद्रकांतदादांनी प्रचारात अनेक दावे केले होते. विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांनी सातत्याने लक्ष्य केले होते. अखेरपर्यंत भाजपच्या विजयाचे दावेही त्यांच्याकडून केले जात होते. मात्र, आजच्या निकालांनी त्यांना जबर धक्का दिला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करून भाजपला पहिला धक्का दिला होता. पुणे विभागातील पुणे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्यांमधील २ लाख ४७ हजार ५० मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता.

विजयासाठी गुरुवारी रात्री १ लाख १३ हजार पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. लाड यांनी पहिल्या फेरीतच एक लाख २२ हजार १४५ मते घेत विजय संपादन केला. पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड राहिला आहे. खुद्द चंद्रकांत पाटील यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या विजयाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे नागपूर पदवीधर आणि मराठवाडा पदवीधरमध्येही महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. आता फक्त अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल बाकी असून तिथे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे. सरनाईक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्यात तिथे जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.

Exit mobile version