Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुढील दोन आठवड्यात कोरोनामुळे राज्यात दररोज १००० जणांच्या मृत्यूची भीती

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्रामधील कोरोनाबाधितांची संख्या पुढील दोन आठवड्यांमध्ये वेगाने वाढणार असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. चार एप्रिलपर्यंत राज्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

सर्वाधिक रुग्णवाढ ही पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये असेल असं सांगण्यात येत आहे. पुण्यामध्ये ६१ हजार १२५, नागपूरमध्ये ४७ हजार ७०७ तर मुंबईत ३२ हजार ९२७ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील असंही सांगितलं जात आहे. नागपूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवांची संख्या वाढवणं गरजेचं आहे पुढील ११ दिवसांमध्ये मृतांची संख्या ६४ हजारांचा टप्पा ओलांडेल अशीही भीती  आहे.

 

बाधित रुग्णांचे प्रमाण आठवड्याला एका टक्क्याने वाढत असल्याचं सर्व जिल्ह्यांमधून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं आहे. याच आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आरोग्य विभागाने हा अंदाज व्यक्त केलाय. संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मृत्यू दर हा २.२७ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे.  पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यामधील एकूण रुग्णांची संख्या २८ लाख २४ हजार ३८२ इतकी होईल आणि मृतांचा आकडा  ६४ हजार ६१३ पर्यंत जाईल असा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुढील दोन आठवड्यांमध्ये कोरोनामुळे दिवसाला एक हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

 

 

 

महाराष्ट्रामध्ये बुधवारी ३१ हजार ८५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात राज्यात रुग्ण आढळून आलेत. राज्यामध्ये रुग्णांची संख्या सध्या २५ लाख ६४ हजार ८८१ आहे. त्यापैकी दोन लाख ४७ हजार २९९ रुग्ण  उपचार सुरु असणारे रुग्ण आहेत. राज्यामध्ये सध्या मृतांची संख्या ५३ हजार ६८४ इतकी आहे. बुधवारी राज्यामध्ये ९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

 

 

 

राज्यामध्ये बेड्सची संख्या, आयसीयू बेड्स आणि व्हेटिंलेटर्सची संख्या पुरेशी असली तरी ऑक्सिजन सेवा असणाऱ्या बेड्सची संख्या चार हजारांनी वाढवण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केलीय. पुढील काही दिवसांमध्ये ठाणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमधील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीती आहे.

 

 

 

मागील चार दिवसांमध्ये राज्यातील रुग्णांची संख्या एक लाखांनी वाढली आहे. सध्या एकूण अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी ४१ टक्के रुग्ण रुग्णालयामध्ये आहेत. त्यापैकी ८ टक्के गंभीर तर ०.७१ टक्के रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

 

कोरोनावर मात  केलेल्या , ताप नसलेल्या आणि शरीरामधील ऑक्सिजनचं प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत असणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित  करून  दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची दर चार तासांनी सहा मिनिटांची चालण्याची चाचणी, ऑक्सिजनचं प्रमाण तपासून पाहणं या  गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे असे डॉक्टर सांगतात

Exit mobile version