Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुढचे ५ दिवस राज्यात पावसाची उघडीप

 

मुंबई: वृत्तसंस्था ।  हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांला  पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

 

राज्यात पुढील पाच दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी मात्र, अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस तुरळक ठिकाणी होईल, असा अंदाज वर्तवला आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी कोणत्याही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला नाही.

 

प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हा आठवडा कोरडा राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनमधील अनियमितता पिकांना नुकसानकारक ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

 

बऱ्याच दिवसा नंतर लातूर जिल्ह्यातल्या कासार सिरसी आणि रेणापूर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे . शेतकरी बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पावसाची वाट पाहत होते. रेणापूर तालुक्यात सरासरी 150 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पानगाव ,कारेपूर ,पोहरेगाव या भागात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिकांना जीवदान मिळाले आहे. रेणा नदीवरील बंधाऱ्यातही मुबलक पाणी जमा झाले आहे .

चार दिवसच्या विश्रांती नंतर भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे . वाशिम तालुक्यातील वाळकी, दोडकी व तांदळी,पार्डी परीसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

 

Exit mobile version