Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश कुणी दिला?

कानपुर : वृत्तसंस्था । हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. “मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते… कुटुंबीयांकडून जबरदस्तीनं हिसकावून घेत पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश कुणी दिला? मागील १४ दिवसांपासून तुम्ही कुठे झोपलेला होतात? तातडीनं कार्यवाही का केली नाही? कधीपर्यंत हेच चालत राहणार आहे? तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?,” असे प्रश्न विचारत प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यानाथ यांना धारेवर धरलं आहे.

हाथरसमधील पीडितेचा दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी कुटुंबीयांकडून पीडितेचं पार्थिव घेत घाईनं अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

१४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी १९ वर्षीय दलित तरुणी शेतात गेली होती. सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा तरुणी घटनास्थळी आढळून आली, तेव्हा तिची जीभ कापलेली होती. मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या. पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत होती. तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. नंतर तिच्यावर तातडीनं अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांच्या भूमिकेबद्दलही संक्षय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने उत्तर प्रदेश पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला आहे. हिंदू संस्कृतीमधील परंपरेनुसार आम्हाला मुलीवर अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळेच आम्ही दिवसा अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली होती. आमच्या सर्व नातेवाईकांना मुलीच्या अंत्यस्कारामध्ये सहभागी होऊन तिचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. मात्र, मुलीचा मृतदेह पोलीस बळजबरीने घेऊन गेले. कोणालाही तिच्या पार्थिवाजवळ जाऊ दिले नाही. कोणीच तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालं नाही. अंत्यदर्शनही पोलिसांनी करु दिले नाही. अंत्यसंस्काराआधी तिचा चेहराही पाहता आला नाही,” असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Exit mobile version