Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीजे रेल्वे पूर्ववत करा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल- आ. किशोर पाटील

पाचोरा, प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी जनतेची दिशाभूल थांबवून पाचोरा -जामनेर दरम्यान धावणाऱ्या पीजे रेल्वे पूर्ववत करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेत.

जागतिक स्तरावर अजिंठा लेणीचे महत्त्व लक्षात घेऊन
पाचोरा -जामनेर दरम्यान धावणाऱ्या पीजे रेल्वे मार्गाचे रुंदीकरण व विस्तारीकरण करून अजिंठा पर्यंत वाढविला जावा अशा प्रकारची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र केंद्रातील भाजपा सरकार ब्रीटिशकालीन देण असलेल्या पाचोरा – जामनेर धावणाऱ्या पीजे रेल्वे नेरोगेज गाडी बंद करण्याचा घाट घालत आहेत. यामुळे पाचोरा रेल्वे स्थानकाचा जंक्शन दर्जा धोक्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशी बांधवांना मिळणाऱ्या इतर सोयी सुविधा देखील कमी होण्याची भीती निर्माण झालेली आहे. दरम्यान जिल्ह्यातील भाजपाचे दोन्ही खासदार मात्र अर्थसंकल्पात विस्तारीकरण व रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाल्याची खोटी माहिती जनतेला देऊन जनतेची फसवणूक करत असल्याचा प्रहार शिवसेना आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केला आहे. तर ‘पी.जे.’ बंद झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा आमदार कीशोरआप्पा पाटील यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, भाजपा खासदारांच्या नाकर्तेपणाचा कळस झाला असून ब्रिटिश काळाची साक्ष असलेल्या पाचोरा ते जामनेर पीजे नॅरोगेज रेल्वेचा प्रशासनाने कोरोना महामारी चा फायदा घेत गाशा गुंडाळला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. देशातील सर्व कर्मचारी भुसावळ विभागात पाठविण्यात आले आहेत. तसेच महत्त्वपूर्ण फ्युएल पॉईंट बंद करण्यात आल्याने आता पीजे रेल्वे इतिहास जमा होणार असल्याचे भीतीदायक व तेवढेच संतापदायक चित्र निर्माण झाले आहे. काही रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मधून ही याबाबतची दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याने समाजमन संतप्त झाले आहे. पीजे रेल्वे पूर्ववत सुरु करण्यात यावी यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाणार असून त्याच्या निषेधासाठी सोमवारी आज रोजी पाचोरा येथे सर्वपक्षीय व सर्व संस्था संघटनांतर्फे बैठक होणार आहे. ब्रिटिश राजवटीत साधारण शंभर वर्षांपूर्वी पाचोरा ते जामनेर या मोठ्या शहरांत दरम्यान व्यापार-उद्योग विकसित व्हावा या हेतूने तसेच या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य हेरून नॅरोगेज रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला. ५७ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गात अनेक लहान मोठी खेडी आहेत. या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे जिनिंग व्यवसायाची ही चांगली प्रगती झाली होती. कालांतराने व्यवहार व लोकसंख्या वाढल्याने हा मार्ग रेल्वे प्रवासी वाहतूक साठी सुरू झाला. कालांतराने त्यात बदल होत गेले. कोळसा इंजिन जाऊन डिझेल इंजिन आणले गेले. प्रथम तिचे रेल्वेच्या दिवसातून सहा फेऱ्या होत असत ५७ किलो मीटर अंतर दोन तासात पार होत असे. त्यासाठी तीन हजार लिटर डिझेल लागत असे. पाच डब्यांमधून तीनशे प्रवाशांची ने-आण केली जात होती. गोराडखेडा – शेंदुर्णी – पहूर – जामनेर व परत असा या गाडीचा प्रवास होता. प्रवास भाडे कमी असल्याने मोठ्या संख्येने प्रवाशांनी या गाडीला पसंती दिली. कालांतराने अजिंठा लेणीचे जागतिक महत्त्व विचारात घेऊन या रेल्वे मार्गाचे रुंदीकरण व विस्तारीकरण करून ते अजिंठा पर्यंत वाढविला जावा अशा प्रकारची मागणी पुढे आली ती मागणी संसदेपर्यंत पोहोचली व गेल्या दहा वर्षांपासून विस्तारीकरण व रुंदीकरण कामासाठी निधीची अंदाजपत्रकात तरतूद झाल्याचे खासदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या असतानाच गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर इतर रेल्वे प्रमाणे ही पीजे रेल्वे देखील बंद करण्यात आले. आता हळू रेल्वे गाड्या सुरळीत होत असल्याने पीजे गाडी देखील सुरू करून मध्यमवर्गीय व सामान्य प्रवाशांना बसणारी आर्थिक झळ थांबवावी अशी मागणी पुढे आली असतानाच या पीजे रेल्वे गाडीचा रेल्वे विभाग गुंडाळत असल्याचे समजले. काही रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांना देखील आपले नाव न सांगण्याच्या अटीवर त्यास दुजोरा दिला. विशेष म्हणजे पाचोरा येथील रेल्वेच्या मुख्य केंद्रात कमालीची सामसूम आहे. एकही कर्मचारी त्याठिकाणी नाही. फक्त गाडीचे डबे उभे आहेत. या मार्गासाठी चे महत्त्वपूर्ण से स्टेशन बंद करण्यात आले आहे. येथील सर्व कर्मचाऱ्यांना भुसावळ विभागात वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आल्याचे कळते खासदारांना आवाहन हा प्रकार भाजपचे खासदार उन्मेश पाटील व रक्षा खडसे यांना घरचा आहेर ठरणारा असून एकीकडे खासदार विस्तारीकरण व रुंदीकरणाची जाहीर करतात आणि दुसरीकडे मात्र ही रेल्वे बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनातर्फे घातला जात आहे. हे खासदारांना मोठे आव्हान आहे. पीजे गाडी बंद झाल्यास पाचोरा स्थानकाचा जंक्शन दर्जा संपुष्टात येऊन त्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा व सवलती देखील संपुष्टात येतील यात शंका नाही या प्रकाराची कुणकुण शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना लागल्याने त्यांनी पीजे रेल्वेच्या पूर्ववत सुरू करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यात पाचोरा येथील प्रवासी बांधव, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत घेतलेल्या बैठकीला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा असून वेळोवेळी या संदर्भात होणाऱ्या आंदोलनात शिवसेनेचा सक्रिय पाठिंबा असेल असे देखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version