पिककर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकेत मनमानी कारभार – आमदार चिमणराव पाटील

पारोळा, प्रतिनिधी । राष्ट्रीयकृत बँका पिक कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करत शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवत आहेत.  अशा बँकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

 

पत्राचा आशय असा की,  या वर्षी उशिराने मान्सून दाखल झाला असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे.  त्यामुळे बियाणे तसेच खते यासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकावे लागत आहे. अश्या अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका पिक कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत मॅनेजर नाहीत तर काही ठिकाणी कर्मचारी वर्ग अपुरा असल्याची तसेच कर्जदार शेतकऱ्यांना वयाची अट अशी अनेक चुकीची व खोटी कारणे दाखवून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सरळ नाकारला जात आहे. आधीच अनेक संकटात गांजलेला शेतकरी या राष्ट्रीयकृत बँकांचा आळमुठे व मनमानी धोरणामुळे पेरणी देखील करून शकले नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडलेला आहे. दुबार पेरणीसाठी बियाणे तसेच उशिराच्या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अश्या भयावह परिस्थितीत शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज पुरवठा करणे संदर्भात वरिष्ट पातळीवरून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व कर्ज नाकारणाऱ्या किंवा अत्यल्प कर्ज वाटप करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

 

Protected Content