Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड

 

पुणे : वृत्तसंस्था । पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड टाकली  आहे.

 

महापालिकेच्या स्थायी समितीची आजची बैठक संपताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं स्थायी समिती कार्यालयाचा ताबा घेतला. दरम्यान ही कारवाई नेमकी कुणावर झाली? या कारवाईत किती रुपये ताब्यात घेतले गेले? याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या कारवाईमुळं महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. स्थायी समितीची बैठक आज असल्यानं महापालिका इमारत परिसरात ठेकेदारांची मोठी गर्दी होती.

 

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना आता पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक होती. ही बैठक दुपारी सुरु झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या कार्यालयावर धाड टाकली. एसीबीने अचानकपणे टाकलेल्या या धाडीमुळे पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर एकच खळबळ उडाली. संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तीन पुरुष आणि एक महिला अधिकारी अचानकपणे स्थायी समिती कार्यालयात दाखल झाले. स्थायी समितीच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या कार्यालयाता ताबा या अधिकाऱ्यांनी घेतला.

 

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीचं कार्यालयही बंद केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईवेळी दोन ठेकेदार स्थायी समितीच्या कार्यालयातच अडकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्थायी समितीची बैठक असल्यामुळे महापालिका परिसरात आज मोठी गर्दी होती. या कारवाई दरम्यान, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती रक्कम जप्त केली, याची माहिती मिळू शकलेली नाही. तर, नोटांची मोजदाद अजून सुरु असल्याचं कळतंय.

 

Exit mobile version