पावसाने ओढ दिल्याने कपाशीचं क्षेत्र घटण्याची भीती

 

 

नांदेड :  वृत्तसंस्था |  लांबलेल्या पावसामुळे राज्यात यंदा कापसाचे क्षेत्र घटण्याची भीती निर्माण झालीय. कपाशीचा पेरा घटण्याचा अंदाज कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने व्यक्त केलाय.

 

गतवर्षी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे कापूस उत्पादक संकटात सापडले होते. आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत तेरा लाख हेक्टरवरील कपाशीची पेरणी यंदा खोळंबलीय. हे चित्र पाहता यंदा कपाशीचा पेरा घटण्याचा अंदाज कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने व्यक्त केलाय.

गेल्या वर्षी राज्यात 43 लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली होती, परंतु यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने आजवर केवळ 30 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झालीय. त्यातच सोयाबीनला यंदा प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयापर्यंत उच्चांकी दर मिळाल्याने कापसाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने चित्र आहे.

 

मराठवाड्यासह विदर्भात कापूस हे प्रमुख पीक आहे मात्र कोरोनामुळे कापूस विकताना मोठ्या अडचणी झाल्या होत्या. कदाचित त्यातून खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीची लागवड घटल्याचे सांगण्यात येतंय.

 

यंदा कधी नाही ते सोयाबीनला बाजारात प्रचंड भाव मिळाला. जून महिन्याच्या आसपास वाशिम इथल्या बाजारपेठेत सोयाबीनला प्रती क्विंटल 9 हजाराच्या आसपास भाव मिळाला होता. खाद्यतेलाच्या टंचाईमुळे खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे सोयाबीनच्या भावातही वाढ झाली होती. मुळात गेल्या दोन वर्षात दुष्काळ आणि परतीच्या पावसाने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. उत्पादन कमी आणि मागणी जास्त झाल्याने सोयाबीनला हा विक्रमी भाव मिळाला, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचं चित्र आहे.  यावर्षी कापसाची लागवड कमी झाल्याने कापसाला देखील यंदा चांगला भाव मिळण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत.

 

सीसीआयने गेल्या वर्षी राज्यात खरेदी केलेल्या कापसातून 27 लाख गाठी तयार केल्या होत्या. यावर्षीच्या हंगामात मात्र ही संख्या 17 लाख गाठीपर्यंत घसरलीय या सतरा लाख गाठी देखील विकल्या आहेत. यंदा कापसाच्या लागवड क्षेत्रात नेमकी किती घट झाली ते येत्या दोन आठवड्यात स्पष्ट होणार आहे. मात्र कृषी विभागाच्या अंदाजानुसार आणि बियाण्याच्या मागणीचा विचार केला असता यंदा कापसाचे क्षेत्र चांगलेच घटणार असल्याचे चित्र आहे.

 

दीड वर्षांपासून बाजारपेठेत मंदी सदृश्य स्थिती आहे. विवाह सोहळे, विविध कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करण्याचे निर्बंध आहेत. भारतासह शेजारच्या देशातही अशीच स्थिती आहे. त्यातून कापड खरेदीचा व्यवसाय मंदावलाय. गुलाबी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचा कापूस उत्पादनाचा खर्च वाढलाय. बाजारात कापूस प्रति क्विंटल 6700 रुपयांचा भाव मिळतोय, मात्र खर्चाच्या तुलनेत हा भाव शेतकऱ्यांना परवडत नाहीये, त्यातून शेतकरी कापसाच्या पिकाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

 

Protected Content