Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पार्थो दासगुप्ताच ‘टीआरपी’ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता हेच ‘टीआरपी’ घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असून त्यांची जामिनावर सुटका झाल्यास त्यांच्याकडून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता आहे, असा दावा मुंबई पोलिसांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला.

 

न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर दासगुप्ता यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

 

न्या प्रकाश नाईक यांच्यासमोर दासगुप्ता यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी दासगुप्ता यांना जामीन देण्यास विरोध केला. दासगुप्ता यांनी चौकशीत अजिबात सहकार्य केले नाही. साध्या प्रश्नांची उत्तरे देणेही त्यांनी टाळले. त्यांच्या या आडमुठेपणामुळे त्यांना प्रश्नावली देण्यात आली होती. मात्र त्यालाही दासगुप्ता यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, असा दावा विशेष सरकारी वकील शिरीष हिरे यांनी केला.

 

दासगुप्ता हेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असून त्यांची जामिनावर सुटका झाली, तर ते पुरावे नष्ट करू शकतील, साक्षीदारांवर दबाव आणू शकतील, अशी भीती हिरे यांनी व्यक्त केली. रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ संवादातून त्यांचा ‘टीआरपी’ घोटाळ्यात थेट सहभाग दिसून येतो, असेही हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

 

पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे दासगुप्ता यांच्या कोठडी चौकशीची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी मागणी गुप्ता यांचे वकील आबाद पोंडा यांनी केली.

Exit mobile version