Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच लाख शार्क माशांचा बळी जाणार

कॅलिफोर्निया: वृत्तसंस्था । कोरोनाच्या लशीमुळे शार्क माशांचे प्राण धोक्यात आले आहे. जगभरातील पाच लाख शार्क माशांचा बळी जाणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील शार्क अलाइज या संस्थेकडून हा इशारा देण्यात आला आहे. अनेक लशींमध्ये शार्कच्या यकृताच्या तेलाचाही समावेश आहे. लशीची परिणामकता वाढवण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. शार्कच्या यकृतात Squalene नावाचा पदार्थ आढळतो. हे एकप्रकारचे नैसर्गिक तेल आहे. याचा वापर लशीत होतो.
जगभरात जवळपास ३० लशीची मानवी चाचणी सुरू आहे. ‘शार्क अलाइज’च्या संस्थापक स्टेफनी बेन्डिल यांनी सांगितले की, कोणत्याही गोष्टींसाठी प्राणी, माशांना मोठ्या प्रमाणावर मारणे योग्य नाही. विशेषत: ज्या जीवांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यांना ठार करणे चुकीचे आहे. लस विकसित होण्याची प्रक्रिया धीम्या गतीने व्हावे असे मुळीच नाही. मात्र, Squalene च्या समावेशाशिवायही लशीची चाचणी करावी असे त्यांनी सांगितले.

जगभरातील नागरिकांना संसर्गाला अटकाव करणाऱ्या लशीच्या दोन डोसची आवश्यकता भासल्यास पाच लाख शार्कचा बळी जाईल. एकाच डोसची आवश्यकता भासल्यास अडीच लाख शार्क मारावे लागतील असे ‘शार्क अलाइज’ संस्थेने म्हटले. सध्या सुरू असलेल्या लस चाचणीत स्वयंसेवकांना प्रत्येकी दोन डोस द्यावे लागले आहेत.

जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने लशीचा एकच डोस पुरेसा असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. अंतिम टप्प्यात ६० हजारजणांवर चाचणी होणार असल्याचे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने स्पष्ट केले आहे. ही चाचणी अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरू आदी देशांमध्ये होणार आहे.

Exit mobile version