Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच दिवस होऊनही महसूलचा संप सुरूच

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – महसूल कर्मचाऱ्याचा संप सुरु असून आज ५ दिवस होऊनही संप मिटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, प्रलंबित मागण्यांसंदर्भात महसूल कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरु आहे, संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयच नव्हेतर तालुकास्तरावर देखील सर्वसामान्यांसह प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत, त्यामुळे महसूल कर्मचाऱ्याचा संप मिटणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रलंबित मागण्यांसंदर्भात महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून आज संपाचा सहावा दिवस आहे, कर्मचाऱ्याच्या न्याय मागण्यासंदर्भात शासनाकडून अद्यापपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या या वेतनवाढ वा आर्थिक संदर्भात नाहीत, त्या तांत्रिक स्वरूपातील आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांना वेळेनुसार पदोन्नती मिळावी, यासह अन्य तांत्रिकदृष्ट्या मागण्या आहेत. बरेचसे कर्मचारी पदोन्नती न घेताच सेवानिवृत्त देखील झालेले आहेत. याबाबत महसूल मंत्री यांच्या सचिव स्तरावर पाच महिन्यापूर्वीच बैठक घेण्यात आली होती, महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात अनुकुलता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे, परंतु प्रशासन स्तरावर कोणतीही हालचाल झालेली नाही किंवा शासन निर्णय देखील झालेला नाही. शासनस्तरावर या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा व अंतिम टप्पा असल्याने या बेमुदत संपात जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुके, सात उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांमधील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष शैलेश परदेशी यांनी म्हटले आहे.
यावेळी कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, भाऊसाहेब नेटके, प्रविण भिरुड, सुधीर सोनवणे, अतुल जोशी, के एम पाटील, किशोर ठाकरे, महिला प्रतिनिधी अनिता पाटील, परविन तडवी, माधवी परमसागर, जगरवाल, ज्येष्ठ सदस्य तथा मार्गदर्शक रविंद्र बारी, देवेंद्र चंदनकर. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे देविदास अडकमोल, नूर शेख, योगेश अडकमोल, सुनंदा पाटील, रणदिवे, घुले तसेच संघटनेचे सर्व जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरीय पदाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी, चाळीसगाव पाचोरा भडगाव तहसील स्तरावरील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन प्रसंगी उपस्थित होते.

 

Exit mobile version