Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षकांनी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले.

तालुका शिक्षण सहकारी संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित नुकतेच करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. राजेंद्र चिंचोले हे उपस्थित होते. तत्पूर्वी संगीत शिक्षक सागर थोरात व रुपेश पाटील यांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या हस्ते वरील मान्यवरांचा शाल व बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी आपल्या प्रस्ताविकातून विद्यार्थ्यांना संघर्ष करून यश संपादन करण्यास सांगितले. तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी इयत्ता दहावी नंतर फक्त विज्ञान शाखेचा आग्रह न धरता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्या संदर्भात तसेच स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात खलील देशमुख यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मुली व महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षक यांनी त्यांच्या शालेय जीवनात शिस्त, संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या कठोर मेहनती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, सांस्कृतिक उपविभाग प्रमुख आर. बी. बोरसे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी यांनी तर आभार प्रदर्शन एम. एन. देसले यांनी केले.

Exit mobile version