Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्या – गटनेते संजय वाघ

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुक, अपघात आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्यावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी, मागणी पाचोरा नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ यांनी केली आहे.

भुयारी गटारी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये दीर्घकाळापासून रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना रस्त्याने वाहनांनी अथवा पायी चालणे देखील कठीण झाले आहे. या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पाचोरा शहरातील सर्वात जास्त वाहतूक असलेला आणि बाजारपेठ असलेला स्टेशन रोड दुरुस्तीसाठी खोदण्यात आला असून केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. एका बाजूला रस्ता दुरुस्तीसाठी खोदला असून दुसऱ्या बाजूला भुयारी गटारीसाठी रस्ता फोडल्यामुळे दोन्ही बाजूने खराब झाल्याचे चित्र स्टेशन रोड परिसरात निर्माण झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॉटेल्स आणि दुकानांवर वाहनांची गर्दी होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत असल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर तसेच नगर परिषदेसमोरच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. नागरिकांना कित्येक वेळी वाहतुकीमुळे रस्त्यात खोळंबून उभे राहावे लागत आहे. याशिवाय सुपडू भादू विद्यालयाजवळ असलेल्या रस्त्याचे देखील दुरुस्तीसाठी खोदकाम  करण्यात आले असून गटारीचे काम देखील सुरू आहे. परंतु हे काम कासवगतीनेसुरू असल्याने बाहेरपूरा, देशमुखवाडी परिसरातील नागरिकांसाठी वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण झाली असून नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. प्रकाश टॉकीज चौकात या रस्त्यातील कामामुळे आणि बँकेसमोर लावलेल्या दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी अनुभवायला येत आहे तर शहरातील गणेश कॉलनी भागात गटारीचे काम सुरू असल्यामुळे गो. से. हायस्कूल मागील रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ते दुरुस्ती काम संथ गतीने होण्यामागे असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधित ठेकेदारांना सूचना देऊन नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी आणि नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देत वेग वाढवावा अशी मागणी संजय वाघ यांनी केली आहे.

Exit mobile version