Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा शहरातील अतिक्रमित घरे होणार नियमित (व्हिडिओ )

 

पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील नगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमितधारक रहिवासीयांसाठी आनंदाची बातमी असून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अतिक्रमित घरे राहिवाश्यांच्या स्वतःच्या नावावर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानुसार शहरातील सुमारे ३ हजार ५०० अतिक्रमीत घरे नियमानुकुल होणार आहेत. याबाबत आमदार किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

आमदार किशोर पाटील व पाचोरा नगरपालिकेच्या पुढाकाराने येत्या सोमवार पासून पाचोरा शहरातील विविध भागातील अठरा ठिकाणी वसलेल्या नागरिकांच्या घरांच्या मोजणी प्रक्रियेला ई.पी.एस. प्रणाली द्वारे गती देण्यात येणार आहे. आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी भूमी अभिलेख व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या संयुक्त बैठकीत याबाबतचे निर्देश दिले आहेत. आगामी काळात या राहिवाश्यांचे स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. दरम्यान, भडगाव शहरातील देखील २०११ पूर्वीच्याअतिक्रमणधारकांची यादी करण्याचे आदेश संबंधितांना दिले असून आगामी दोन ते तीन दिवसात यशवंत नगर भागासह संपूर्ण भडगाव शहरातील घरे देखील पाचोऱ्याच्याच धर्तीवर नियमित करण्यात येणार आहे.

दरम्यान शुक्रवारी दि. २९ रोजी आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुकुंद बिल्डींकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांचेसह मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भगवान भोये, शहर भूमापक पी. व्ही. कुलकर्णी, नगररचना विभागाच्या मानसी भदाणे, यांचे सह नगरपालिका व भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि. १७ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार सन २०११ व त्याआधीचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण असून याबाबत पाचोरा पालिकेने पुढाकार घेतला आहे.
पाचोरा शहरातील बाहेरपूरा, बहिरमनगर, बंजारा वस्ती, भीमनगर, भोईवाडा, गोंडवस्ती, हनुमान नगर, जनता वसाहत, कुर्बान नगर, महात्मा फुले नगर, माहेजी नाका, मिलिंद नगर, नागसेन नगर, दसेरा मैदान ( मोंढाळा रोड), रसूल नगर, श्रीराम नगर, वंजार वाडी, वरखेडी नाका भागातील सुमारे ३५०० घरे नगर पालिकेच्या नोंदी प्रमाणे अतिक्रमित असून याच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या मदतीसाठी पालिकेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मधुकर सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता हिमांशू जैस्वाल, सहाय्यक प्रकाश पवार, विलास देवरे यांचेसह कर्मचारी मदत करणार असून त्यामुळे मोजणी प्रक्रियेस गती मिळणार आहे.

आमदार किशोर पाटील यांनी लाइव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की, राज्य शासनाच्या धोरणानुसार २०११ पूर्वीचे अतिक्रमण धारकांची घरे स्वतः च्या नावावर लावण्यासाठी पाचोरा पालिकेने पुढाकार घेतला असून यासाठी मोजणी प्रक्रिया सोमवार पासून सुरू होत आहे यासाठी लागणारी रक्कम निश्चित करून त्यावर निर्णय घेतला जाईल याच धर्तीवर भडगाव शहराचे देखील अतिक्रमण नियमनाकुल केले जाईल भडगाव शहरातील अतिक्रमण धारकांची यादी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

Exit mobile version