Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा बाजार समितीवरील प्रशासक नियुक्ती आदेश रद्द : संचालक मंडळाची माहिती

 

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवरी प्रशासक नेमणुकीचा राज्य शासनाच्या आदेशास आव्हान देणारी याचिका सभापती व संचालक मंडळाने औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत प्रशसक नेमणुकीचा आदेश रद्द ठरवून शासनाने या मुदतवाढीच्या प्रस्तावावर पुन्हा निर्णय घेण्याचे आदेश देऊन तत्कालीन संचालक मंडळाचा पदभार पुनर्स्थापित करून बाजार समितीचे कामकाज पाहावे असे आदेश दिले असल्याची माहिती सभापती सतीश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, कृ. उ. बा. समिती पाचोरा- भडगाव च्या संचालक मंडळाची मुदत दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी संपली होती. कोविड – १९ मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने मुदत संपलेल्या किंवा संपणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिलेली होती. त्यामुळे बाजार समिती पाचोरा – भडगावच्या संचालक मंडळाने ठराव करून दि. १० सप्टेंबर २०२० रोजी महा. शासन, उपसचिव-सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मुंबई यांना संचालक मंडळास मुदतवाढ मिळणेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु, सदर मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे  प्रलंबित असतानाच घाई गडबडीत शासनाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांना दि. २१ सप्टेंबर २०२० च्या आदेशान्वये बेकायदेशीर व राजकीय भेदभाव करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पाचोरा यांची बाजार समितीचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

तसेच शासनाने राजकीय हेतूने ज्या बाजार समितीवर महाविकास आघाडीचे संचालक मंडळ कार्यरत होते त्यांना मुदतवाढ दिली व ज्या बाजार समितीवर भा. ज. पा. चे संचालक मंडळ कार्यरत होते त्यांना मुदतवाढ न देता शासकीय अधिकारी यांची बेकायदेशीरपणे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. कृ. उ. बा. समिती पाचोरा – भडगाव चे सभापती सतीश शिंदे व संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे प्रशासक नेमणुकीस आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. सदर याचीके संदर्भात न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला, एस. डी. कुलकर्णी यांनी पाचोरा, जामनेर व अमळनेर बाजार समितीवर प्रशासक नेमणुकीचा शासन आदेश पूर्णतः रद्द ठरवून महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांना सदरील बाजार समित्याच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर पुन्हा निर्णय घेण्याचे आदेशित केले. तोपर्यंत यापूर्वीच्या संचालक मंडळाने बाजार समित्यांचे कामकाज पाहवे व त्यांचा पदभार पुनर्स्थापित  केला.

बाजार समिती पाचोरा- भडगावच्या संचालक मंडळातर्फे  उच्च न्यायालयात जेष्ठ विधीतज्ञ अॅड. व्ही. डी.साळुंखे व अॅड. परेश बी.पाटील, अॅड. विश्वासराव भोसले यांनी कामकाज पहिले. या पत्रकार परिषदेत सभापती सतीष शिंदे , उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले, संचालक नरेंद्र विक्रम पाटील, दिलीप मन्साराम पाटील, सिंधु शिंदे, सुनंदा बोरसे, धोंडू हटकर, प्रिया संघवी, गनी शाह हे उपस्थित होते.

 

Exit mobile version