Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत निसर्ग अन् पैश्यांचा पाऊस

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी शिंदे सेनेत भाजपाचे दोन, महाविकास आघाडीत व भाजपाचे स्वतंत्र पॅनल अशा तीन पॅनलमधे अतिशय चुरशीची लढत झालेली आहे. आमदार किशोर, माजी आमदार दिलीप व वैशाली सुर्यवंशी आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी तीन पॅनल तयार करून आप आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

 

पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत वि.का. सोसायटी मतदार संघातील ११ उमेदवार निवडणूक द्यावयाचे असल्याने सोसायटीच्या मतदारांना २० ते २५ हजार रुपयांचे पाकिट दिल्यानंतर काही उमेदवारांनी वैयक्तिक रित्या मतदान पदरात पाडून घेण्यासाठी पाच हजार रुपये या व्यतिरीक्त मतदानाला जातांना मतदार क्रमांकाची चिठ्ठी घेतांना आधार कार्ड दाखवून एक हजार रुपये तर ग्रामपंचायत मतदार संघाचे चार उमेदवार निवडणूक द्यावयाचे असल्याने या मतदारांना सहा ते सात हजारांचे पाकिट दिल्यानंतर चिठ्ठी घेतांना एक हजार रुपये देण्यात आले.

 

पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत अतिशय धिम्या गतीने मतदार झाल्याने सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत ३.११ टक्के, दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत १६.५० टक्के मात्र दुपारी बारा वाजेनंतर महिला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी निघाल्याने बारा ते दोन वाजेपर्यंत ५१.८५ टक्के मतदान झाले होते. प्रत्येक बुथवर मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी २.०० ते २.१० पर्यंत दहा मिनिटं जोरदार पाऊस झाल्याने मतदार व उमेदवारांची पळापळ झाली होती. श्री. गो. से. हायस्कूल या एकमेव मतदार केंद्राबाहेर आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे, सतिष शिंदे हे ठिय्या मांडून बसले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नामदेव सुर्यवंशी, सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे हे काम पहात आहेत. यावेळी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Exit mobile version