Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा आगाराचे कर्मचारी बेमुदत संपवर (व्हिडिओ )

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा आगारातील सुमारे २८७ कर्मचारी हे दि. ७ नोव्हेंबर दुपारी २:३० वाजेपासून बेमुदत संपावर गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील संपूर्ण एस. टी. महामंडळाचे कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून संपावर गेले होते. परंतु, राज्य शासनाने ठराविक मागण्या मान्य करत उर्वरित रास्त मागण्या मान्य न केल्याने पाचोरा आगारातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत बेमुदत संपास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांमुळे पाचोरा आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून ऐन दिवाळी सारख्या सणात प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून खाजगी प्रवाशी वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे व शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे सर्व भत्ते व सुविधा जशास तशा मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील अनेक आगारातील कनिष्ठ कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर आहेत. त्यातील राज्य शासनाने ठराविक मागण्या मान्य करत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांना उर्वरित मागण्याही लवकरात लवकर मान्य करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. परंतु १५ दिवस उलटुनही उर्वरित मागण्या मान्य न झाल्याने आज दि. ७ रोजी दुपारी २:३० वाजेपासून पाचोरा आगारातील कर्मचारी संपावर गेले आहे.

 

यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दि. ७ नोव्हेंबर पासून पुकारण्यात आलेल्या संपात पाचोरा आगारातील १३१ चालक, १४१ वाहक, ५३ मॅकेनिकल व १५ कार्यालयीन लिपीक असे २८७ कर्मचारी संपावर गेल्याने पाचोरा आगारास मिळणारे प्रतिदिन ६ लाख रुपये उत्पन्न बुडणार आहे. याबाबत राज्य शासनाने योग्य विचार करुन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस. टी. कर्मचारी संघटना यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version