Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाकिस्तानी खासदारांकडून हिंदू समुदायाची क्षमायाचना

 

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । पाकिस्तानात  पंतप्रधान इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ पक्ष सत्तेवर आहे. इम्रान खान यांच्या पक्षाच्या आमिर लियाकत हुसैन या खासदाराला त्याने केलेल्या टि्वटमुळे माफी मागावी लागली तसेच हिंदू समाजाचा अनादर करणारे टि्वटही डिलिट कराव लागले.

 

पाकिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजाने आमिर लियाकत हुसैन यांच्या टि्वटचा मोठया प्रमाणावर निषेध केला व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. आमिर लियाकत हुसैन तेहरीक-ए-इन्साफकडून राष्ट्रीय सभागृहाचे सदस्य आहेत. विरोधी पक्षनेत्या मरीयन नवाज यांची खिल्ली उडवण्यासाठी आमिर लियाकत हुसैन यांनी हिंदू देवतेचा फोटो टि्वट केला. त्यावरुन या सर्व वादाला सुरुवात झाली. मरीयम नवाज ही माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आहे.

 

हुसैन टीव्हीवर निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत. धार्मिक अभ्यासक म्हणूनही ते ओळखले जातात. पाकिस्तानातील हिंदू समाजाबरोबर तिथल्या राजकारण्यांनाही आमिर लियाकत हुसैन यांच्या टि्वटचा निषेध केला. “धार्मिक स्कॉलर म्हणवणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचे टि्वट करणे शोभत नाही. त्याच्या लज्जास्पद कृत्याचा आम्ही निषेध करतो” असे रमेश कुमार वाकंवानी म्हणाले. ते पाकिस्तान हिंदू परिषदेचेही प्रमुख आहेत.

 

पाकिस्तानातील हिंदूंकडून झालेल्या निषेधानंतर आमिर हुसैन यांनी ते टि्वट डिलिट केले व हिंदू समाजाची माफी मागितली. “हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याची मला कल्पना आहे. सर्व धर्मांवर माझा विश्वास आहे, हेच मला माझ्या धर्माने शिकवले आहे” असे आमिर हुसैन म्हणाले.

Exit mobile version