Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाकिस्तानात शिया – सुन्नी वाद पुन्हा विकोपाला

 

कराची, वृत्तसंस्था । पाकिस्तानमधील कराचीच्या रस्त्यावर शिया समुदायाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कट्ट्ररतावादी सुन्नी संघटनांचाही समावेश होता. या आंदोलनानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा दंगल होण्याची शक्यता वाढली आहे. या आंदोलनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

कराचीमध्ये शुक्रवारी हे आंदोलन झाले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने जमाव उपस्थित होता. यावेळी शिया समुदायातील नागरिकांच्या हत्येसाठी कुख्यात असलेल्या सिपाह-ए-सहाबा या दहशतवादी संघटनेचे बॅनर झळकवण्यात आले होते. यावेळी ‘शिया काफीर है’ सारख्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

शिया समुदायाच्या काही नेत्यांनी इस्लामविरोधात वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सोशल मीडियावर शियाविरोधात ट्रेंड चालवण्यात येत असून हिंसाचाराला प्रवृत्त करण्यात येत आहे. आफरीन या महिला कार्यकर्तीने सांगितले की, पंतप्रधान इम्रान खान हे शियांविरोधात वाढत्या द्वेषाला जबाबदार आहेत.

काही वर्षांआधी शिया समुदायाशी संबंधित अनेकांना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी संदेश मोबाइलवर आले होते. काही दहशतवाद्यांनी आशुराच्या वेळेस ग्रेनेड हल्ला केला होता. शियांना आशुरा मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे अशी मागणी होती. मात्र, पाकिस्तान सरकारकडून शियाविरोधात असणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिशी घातले जात असल्याचे चित्र असल्याचे आफरीन यांनी सांगितले.

इस्लाम धर्मियांमध्ये शिया आणि सुन्नी हे दोन महत्त्वाचे पंथ आहेत. मात्र, या दोन्ही पंथांमध्ये वाद आहेत. अल्लाह एकच आहे यावर दोन्ही पंथांचे एकमत आहे. मात्र, मात्र धर्मपालनाच्या विविध पद्धती तसेच प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या निर्वाणानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यामुद्यावर दोन्ही पंथांमध्ये तीव्र मतभेद आहेत. जगभरातील मुसलमानांपैकी जवळपास ८० ते ८५ टक्के हे सुन्नी पंथीय मुस्लिम असून उर्वरित १५ ते २० टक्के शिया पंथीय मुस्लिम आहेत

Exit mobile version