Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना कशासाठी ? – ओवेसी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | जम्मू-काश्मिरात पाक समर्थक दहशतवाद्यांचा धुडगुस सुरू असतांना टि-२० विश्‍वचषकात पाक विरूध्द क्रिकेटचा सामना कशासाठी खेळविला जात आहे ? असा सवाल करत एआयएमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

 

जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. अशा परिस्थितीत संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये होत असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी होणार्‍या या मॅचविरोधात देशभरातून विरोध सुरू झाला आहे. यातच एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या मॅचविरोधात भूमिका घेतली आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनवर बोलण्यास नेहमीच घाबरतात. चहामध्ये साखरही टाकत नाही जेणेकरून चीनचा उल्लेख होऊ येऊ नये. मोदींना सांगू इच्छितो की ते दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची महागाई आणि दुसरी चीनची घुसखोरी. चीन आपल्या देशात घुसून बसला आहे असे ओवेसी म्हणाले.

चीन डोकलाम, डेपसांगमध्ये बसला आहे आणि भारताचे पंतप्रधान काहीच करत नाहीत. त्यांना चीनबद्दल बोलायला भीती वाटते. आम्हाला भारताच्या पंतप्रधानांना विचारायचे आहे की सैन्याचे नऊ सैनिक मारले गेले आहेत आणि २४ तारखेला भारत आणि पाकिस्तानचे टी २० आयोजित करण्याची तयारी करण्यात येत आहे. भारतीय सैनिक मरत आहेत आणि मनमोहन सिंग सरकार पाकिस्तानला बिर्याणी खायला घालत आहे, असे तुम्ही म्हटले होते ना? नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी २० खेळणार आहात? आज पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे, पण तुम्ही काय करत आहात? आयबी, अमित शाह काश्मीरमध्ये काय करत आहेत?, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

Exit mobile version