Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघी बहिणींना मध्य प्रदेशात अटक

 

भोपाळ : वृत्तसंस्था । पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाऱ्या दोघां बहिणींना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली आहे.

 

इंदौरजवळील महू येथील सैन्य छावणीत हेरगिरी करत असल्याचा या दोघींवर आरोप आहे. या दोघी इंदौरच्या गवळी पलासिया भागात राहणाऱ्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या पाकिस्तानमधील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि महू सैन्य छावणीची माहिती पुरवत होत्या. काही दिवसांपूर्वी दोघी जणी रस्त्यावरून जात असताना पाकिस्तानातील व्यक्तींशी बोलत होत्या. या दरम्यान गुप्तचर विभागाने त्यांच्या फोनची फ्रिक्वेंसी पकडली आणि त्यांचं बिंग फुटलं. त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सतत चार दिवस पाळत ठेवली होती. अखेर त्यांच्या संशयास्पद हालचाली वाढल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

दोन्ही बहिणींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडील लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या दोघी पाकिस्तानी गुप्तहेरांशी गेल्या वर्षभरापासून संपर्कात होत्या. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर खोटी ओळख असलेली खातीही तयार केली होती. संशय येऊ नये यासाठई या दोघींनी चार महिन्यात चार सिमकार्ड विकत घेतली होती. तसेच त्यांना मॉरिशसमधून फंडिंग होत असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

 

या दोघी बहिणी महू येथील एका शाळेत शिकवायचं काम करत होत्या. यातील एकीचं वय ३२ तर एकीचं वय २८ वर्षे आहे. पाकिस्तानातील मोहसीन खान आणि दिलावर यांच्या संपर्कात असल्याचं उघड झालं आहे. अटक केल्यानंतर गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलीस कसून तपास करत आहे.

Exit mobile version