Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पांझर तलावाजवळ विना औषधी निसर्गोपचार केंद्राचे उद्घाटन

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर पासून जवळ असलेल्या धार मालपूरच्या पांझर तलावा जवळ नाविन्य प्रतिष्ठान निर्मित “डॉ बी.एस. पाटील विना औषधी निसर्गोपचार केंद्राचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. निनाद पाटील,डॉ. अर्चना पाटील उपस्थित होते.

 

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, ” सध्याच्या आधुनिक युगात सर्व सामान्य माणसास आपल्या वैद्यकीय उपचारासाठी खूप पैसा लागतो व मोठ्या शहरात जावे लागते. परंतु विना औषधीने आनंदी जीवन जगायचे कसे ? यासाठी अमळनेर सारख्या ग्रामीण भागात निसर्गरम्य वातावरणात डॉ बी एस पाटील यांनी विना औषधी निसर्गोपचार केंद्र सुरू केले हे एक सामाजिक दृष्ट्या उचललेले मोठे पाऊल असून विना औषधी उपचार करण्याचे तंत्र एक एम डी डॉक्टर देताय हे देखील कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ते पुढे म्हणाले की, डॉ.बी.एस. पाटील यांनी आधीच येथील जागा धार मालपूर पाझर तलावासाठी दिली असताना स्वतःकडे शिल्लक ठेवलेल्या थोड्याश्या जागेचाही जनसेवेचे केंद्र सुरू  करून सदुपयोग करीत आहेत,डॉ बी एस पाटील नेहमीच आपण जगावे कसे हेच सांगत आले आहेत,आता हे विना औषधी केंद्र सुरू करून त्यांनी आपल्या भूमीतील वैद्यकीय सुविधेत एक नवीन भर टाकली आहे,येथील अनुभूती घेऊन प्रत्येकाची दिनचर्या आता बदलणार आहे,यामुळे डॉ बी एस पाटील यांचे नाव अजरामर होणार असल्याची भावना आ पाटील यांनी व्यक्त केली.

 

हे होणार निसर्गोपचार

सदर निसर्गोपचार केंद्रात फिजिओथेरपी, सनबाथ, स्टीम बाथ, अँक्युपंक्चर, अँक्युप्रेशर, फूट स्पा, इन्फ्रारेड, बॉडीमसाज, वाँकिंग ट्रँक, विपश्यना ध्यान, जलनेती, जलौका, अग्निकर्म, रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा चिकित्सा, आहार, आजार, उपचार विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रौढांसाठी लघु व्यायाम, वाचन, मनोरंजन, तरुणांसाठी खेळ याचा ही सामावेश राहणार आहे. सदर केंद्रात डॉ. बि. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनात आयुर्वेदाचार्य डॉ चंद्रकांत पाटील, फिजिओथेरपीस्ट डॉक्टर अविनाश खाडे आदी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ उपचार व मार्गदर्शन करणार आहेत.

 

माझा हा तिसरा अध्याय सुरू- डॉ.बी. एस. पाटील

कार्यक्रमाचे प्रास्तविकात सदर केंद्राचे निर्माते डॉ बी.एस. पाटील यांनी सांगितले की ” माणसाच्या आयुष्यात विविध अध्याय येतात माझ्या आयुष्यात  आधी डॉक्टर नंतर 25 वर्ष राजकारण आणि आता हा  तिसरा अध्याय सुरू झाला आहे. दरम्यान कुठेही पडदा पडू दिला नाही. मूळ वैद्यकीय व्यवसाय सोडलाही नाही. “Never Retire” हे ब्रीद माणसाने नेहमी मनाशी बाळगायला हवे. आणि यातून पैसा कमविणे हा उद्देश कधीही मनाशी ठेवला नाही. यातून समाजसेवा देताना लोक चांगले आशीर्वादही देऊन जातात.”अशी भावना त्यानी व्यक्त केली.

 

 

यावेळी माजी प्राचार्य डॉ एस.आर.चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नावीन्य प्रतिष्ठानचे डॉ बि. एस. पाटील.सौ सुनीता पाटील ,डॉक्टर निनाद पाटील डॉ चंद्रकांत पाटील,डॉ अर्चना पाटील,  यांनी मान्यवरांचा स्वागत व सत्कार केला .   स्व.एस एस.पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील व कर्मचारी यांच्या तर्फे शेतकऱयांचे दैवत असलेले बैलजोडी व गाडी भेट देण्यात आली.सौ सुनंदा विनोद कोठारी यांनी केंद्रातील वाचनालयास  विविध पुस्तके भेट दिली.

 

यावेळी माजी प्राचार्य अजित वाघ (जळगांव), शिरपूरचे नगरसेवक राजू पाटील, नंदूरबारचे डॉ. एस.आर.पाटील, धुळेचे डॉ भालचंद्र देसले,बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सौ तिलोत्तमा रवींद्र पाटील, हातेडचे राजेंद्र पाटील,93 वर्षीय भगवान पाटील यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.  सुत्रसंचलन शरद सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाला शहरातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नावीन्य प्रतिष्ठानचे डॉ. चंद्रकांत पाटील, सचिव जाकीर शेख, संदीप पाटील, किशोर सोनवणे, बाळासाहेब जीवन पाटील, लोण येथील महेश उत्तमराव पाटील, निंभोराचे समाधान धनगर, इतर शिक्षक व शिकक्षकेतर वृंद यांनी परीश्रम घेतले.

Exit mobile version