Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे अजून एक कोरोना पॉझिटीव्ह; संपर्कातील लोक क्वॉरंटाईन

पहूर, ता. जामनेर रवींद लाठे । येथे आज पुन्हा एका वृध्दाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून यामुळे पहूर येथे दोन तर खर्चाणे येथे एक असे परिसरात तीन रूग्ण झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

याबाबत वृत्त असे की, दोन दिवसांपूर्वी पहूर पेठ येथील रहिवासी सुप्रीम कंपनी मध्ये कामगार असलेल्या २७ वर्षीय युवकाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा एका वृध्दाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच येथून जवळच असलेल्या खर्चाणे येथीलही एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पहूर चे दोन तर खर्चाणा येथील एक असे परिसरात तीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यामुळे गावकर्‍यांनी आता तरी सावध व्हावे, असे आवाहन पहूर पेठ चे सरपंच निताताई पाटील व पहूर कसबे चे सरपंच ज्योती ताई घोंगडे, रामेश्‍वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे, पहूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी प्रशासनाचे वतीने केले आहे.

लोंढरी येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आल्यानंतर पहूर पेठ येथील पॉझीटीव्ह आलेल्या तरुणाच्या संपर्कातील दहा जण, तर काल रात्री खर्चाणा येथील पॉझीटीव्ह आलेल्या च्या संपर्कातील बावीस जण असे एकूण बत्तीस जणांना पहूर येथील कॉरंटाईन कक्षात ठेवण्यात आले असल्याचे नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी सांगितले आहे.

पहूर येथील एक वृद्ध जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी खाजगी लॅब मध्ये स्वॅब नमुना दिला होता त्यांचा अहवाल आज पॉझीटीव्ह आढळला आहे. पहूर चे आता एकुण दोन पॉझीटीव्ह असून खर्चाणे येथीलही एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान येथील महावीर पब्लिक स्कूल व आर.टी.लेले हायस्कूल या कॉरंटाईन कक्षात पहूर पेठ ग्रामपंचायत व पहूर कसबे ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वच्छता साफसफाई करून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून यात पहूर येथील बाधित तरुणाच्या संपर्कातील दहा जण तर खर्चाणा येथील बाधिताच्या संपर्कातील बावीस असे एकूण बत्तीसजणांना कॉरंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे. तर खर्चाण्यातहि निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून बाधीत रहात असलेला परिसर सिल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन मध्ये ३० जून पर्यंत मुदतवाढ केलेली असली तरी ग्रामस्थांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. यामुळे ग्रामस्थांनी नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Exit mobile version