Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

देशातील कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचं ऑनलाईन शिक्षण सुरु केलं आहे, मात्र ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत.

 

कोव्हिड – 19 च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगातील विद्यार्थ्याना संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यातदेखील ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती.

 

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

 

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे.

 

सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतचा 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

 

 

कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा आणि तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत, याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

 

Exit mobile version