Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहाटेच पंतप्रधान मोदींची दिल्लीतील गुरुद्वाराला ‘अनियोजित’ भेट

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अचानक दिल्लीस्थित रकाबगंज गुरुद्वारा परिसरात दाखल झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत गुरु तेग बहादूर यांना नमन केलं. रायसीना हिल्सच्या मागच्या बाजुला स्थित असणाऱ्या या गुरुद्वारामध्ये गेल्या २५ दिवसांपासून ‘शीख समागम’ सुरू आहे.

 

उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यादरम्यान कोणत्याही पद्धतीची व्हीआयपी व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. तसंच सामान्य जनतेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्राफीक बॅरियर लावण्यात आले नव्हते. पंतप्रधान मोदींच्या गुरुद्वारा रकाबगंज इथल्या दौऱ्यात कोणतीही विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती.

 

पंतप्रधानांच्या या भेटीबद्दल त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आलीय तसंच इंग्रजीसोबतच पंजाबी भाषेतही ट्विट करण्यात आलंय.’जिथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब गुरुद्वारात आज सकाळी मी प्रार्थना केली. मला अत्यंत प्रसन्न वाटलं. मी जगातील कोट्यावधी लोकांप्रमाणेच श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणानं मलाही खूप प्रेरणा दिली आहे’ अशी भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या या भेटीनंतर व्यक्त केलीय.

‘आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजींच्या ४०० व्या प्रकाश पर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत, ही गुरु साहेबांचीच कृपा आहे. चला, हा मंगल प्रसंगी ऐतिहासिक मार्गाने चिन्हांकित करू आणि श्री गुरु तेग बहादूरजी यांचा आदर्श साजरा करू’ असंही म्हणत आपल्या या भेटीचे काही फोटोही पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

 

 

Exit mobile version