Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांचे रोड शो मधून शक्तिप्रदर्शन

 

कोलकाता : वृत्तसंस्था । गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मिदनापूरमध्ये ममता बॅनर्जी यांची साथ सोडत सुवेंदू अधिकारी यांच्यासहीत बंगालच्या जवळपास ४२ नेत्यांनी भाजपला जवळ केलंय.आज पुन्हा अमित शहा पुन्हा मेगा रोड शोद्वारे शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी पहाटे बंगालच्या नाडिया जिल्ह्यात एका भिंतीवर चक्क नागरिकांना धमकी देणारी एक सूचना लिहिण्यात आलेली दिसली.

‘तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपला एकही मत दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील’ असं बंगाली भाषेत लिहिलेल्या या सूचनेत म्हटलं गेलंय. ही आक्षेपार्ह सूचना नेमकी कुणी लिहिली, याबद्दल मात्र प्रश्नचिन्हं कायम आहे. या भागात भाजपचे जगन्नाथ सरकार हे खासदार तर टीएमसीचे अरिंदम भट्टाचार्य हे आमदार आहेत.

नाडियातल्या या घटनेपूर्वी शनिवारी रात्री उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बरेकपूरमध्ये काही जणांकडून भाजपच्या एका कार्यालयाला आग लावण्यात आली होती. त्यामुळे या भागातही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या भागातील टीएमसीचे आमदार शीलभद्र दत्त यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचं बोट धरलंय. त्यानंतर ही घटना घडली.

भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर वारंवार हिंसेचा आरोप केला जातोय. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपनं तृणमूल काँग्रेसकडेच बोट दाखवलं होतं. तर ‘भाजप नेते पश्चिम बंगालमध्ये दररोज कडक सुरक्षेसहीत राज्यात दाखल होतात. राज्यात दौऱ्यावर येणारा भाजपचा कुणीही ऐरा-गैरा नेता आपल्यासोबत येताना सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि केंद्रीय दलाच्या जवानांना घेऊन येतो. लज्जास्पद म्हणजे, अशा ‘बनावट’ हल्ल्यांपासून ते तुमची सुरक्षा करू शकले नाहीत’ असं म्हणत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपच्या आरोपांची हवाच काढून घेतली होती. नड्डांवरचा हल्ला बनावट असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

Exit mobile version