Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पश्चिम बंगालच्या विभाजनाची भाजपा खासदारांची मागणी

 

कोलकाता : वृत्तसंस्था । भारतीय जनता पार्टीच्या  तीन खासदारांनी पश्चिम बंगाल  राज्याचे  विभाजन करण्याची मागणी केलीय.

 

या तिन्ही खासादारांनी एक समिती तयार केली असून प्रस्तावाच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधून दोन राज्यांची निर्मिती करुन त्यांना मान्य देण्यात यावी अशी मागणी केलीय. अलीपुरद्वारचे भाजपा खासदार जॉन बरला, खासदार जयंत रॉय आणि कूचबिहारचे खासदार निशित प्रमाणिक यांनी काही आमदारांच्या मदतीने एक समिती निर्माण करुन राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडलाय.

 

या प्रस्तावानंतर अलिपुरद्वारमध्ये भाजपाचे अनेक कार्यकर्ते  जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद शर्मांच्या नेतृत्वाखाली पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत. मागील महिन्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपाने अलीपुरद्वारमधील सर्व पाच जागांवर विजय मिळवला होता.

 

दुसरीकडे बंगाल भाजपाने आपल्या खासदारांच्या या मागणीशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. पक्षाच्या नेत्यांनी पक्ष नियमांचे उल्लंघन करु नये असा इशारा देण्यात आला आहे. भाजपा खासदारांनी केलेल्या मागणीनंतर होणाऱ्या टीकेवर राज्यातील पक्षाध्यक्ष दिलीप घोष यांनी भूमिका स्पष्ट केलीय. “आमच्या काही नेत्यांनी त्यांच्या व्यक्तिगत मर्यादेमध्ये काही मत मांडली आहे. याचा पक्षाच्या भूमिकेशी काहीही संबंध नाहीय. पक्ष बंगलाच्या विभाजनाला पाठिंबा देत नाहीय. आमचा या विभाजनाला विरोध आहे. एका शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे सर्वांनी पक्षाच्या नियमांचे पालन केलं पाहिजे. नियमांचे उल्लंघन केल्यास पक्षाकडून ते सहन केलं जाणार नाही,” असा इशारा घोष यांनी दिलाय.

 

घोष यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर विभाजनासंदर्भात मागणी करणाऱ्या सौमित्र खान यांनी आपण आपल्या व्यक्तीगत स्तरावर ही मागणी केलीय असं सांगितलं. दुसरीकडे पश्चिम बंगाल काँग्रेसने मंगळवारी भाजपावर राज्याच्या विभाजनाचा कट रचण्याचा आरोप केलाय. हा विभाजनाचा विषय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोठ्या योजनेला भाग असल्याचा दावा केला जातोय.

 

बंगालमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी या विषयावरुन भाजपा टीका केलीय. “भाजपाच्या प्रत्येक निर्णयामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतो हे सर्वांना माहितीय. पंतप्रधान मोदी सुद्धा आरएसएसने प्रभावित आहेत. मुस्लिम लोकसंख्या अधिक असणारे प्रांत मूळ राज्यांपासून वेगळे करुन त्यांचा इतर राज्यांमध्ये समावेश करुन घेण्याची आरएसएसची जुनी योजना आहे,” असं अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.

 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्याच्या विभाजनाच्या मागणीवरुन राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजपामधील अनेकांचा राज्याच्या विभागणीच्या प्रस्तावाला विरोध असल्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रसने यासंदर्भातील भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

 

Exit mobile version